Pune : भटक्या कुत्र्यांची रस्त्यांवर दहशत, पुणे शहरात अकरा महिन्यांमध्ये श्वानदंशाच्या तब्बल २०,९७४ घटना

पुण्यात जणू भटक्या कुत्र्यांचे राज्य सुरू झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्वानदंशाच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत अकरा महिन्यांतच तब्बल २०,९७४ घटना घडल्या आहेत.

Pune : भटक्या कुत्र्यांची रस्त्यांवर दहशत, पुणे शहरात अकरा महिन्यांमध्ये श्वानदंशाच्या तब्बल २०,९७४ घटना

भटक्या कुत्र्यांची रस्त्यांवर दहशत, पुणे शहरात अकरा महिन्यांमध्ये श्वानदंशाच्या तब्बल २०,९७४ घटना

दिवसात सरासरी सात जणांना चावा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यात जणू भटक्या कुत्र्यांचे राज्य सुरू झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्वानदंशाच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत अकरा महिन्यांतच तब्बल २०,९७४ घटना घडल्या आहेत.

शहरात कुत्रा चावण्याच्या दररोज साधारण सात घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरामध्ये १,७९,९४० भटके कुत्रे आहेत. त्यापैकी ८५,१३३ भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. २०२१ मध्ये कुत्रा चावण्याच्या १२,०२४  घटना घडल्या होत्या.  २०२२ मध्ये याप्रकारच्या १६,५६९ घटना नोंदल्या गेल्या होत्या. २०२३ मध्ये नोव्हेंबरपर्यंत श्वानदंशाची प्रकरणे चक्क २१ हजारांच्या घरात गेली आहेत.

भटक्या कुत्र्यांची नक्की संख्या किती, याचा अंदाज घेण्यासाठी २०२३ मध्ये अभ्यास प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेबीज निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. २०३० पर्यंत भारताला रेबीजमुक्त करण्याचे धोरण आहे. मात्र, गेल्या वर्षी पुणे शहरात रेबीजच्या ७० पॉझिटिव्ह केसची नोंद झाली होती.  मार्च २०२३ पर्यंत ११ पॉझिटिव्ह केसेस होत्या.

मुकुंदनगर येथील रहिवासी हेमंत जगदाळे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की,‘‘माझ्या सात वर्षांच्या मुलाला दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावला.  त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. माझ्या मुलाच्या मनात आता धास्ती बसली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास कधी कमी होणार, हा प्रश्न माझ्यासारख्या लाखो नागरिकांना पडला आहे.’’ बाणेर येथील रहिवासी ध्रुव पांचाळ म्हणाले, ‘‘माझ्याकडे एक कुत्रा आहे. मात्र, आमच्या परिसरात खूप भटकी कुत्री असल्याने त्याच्यावर हल्ला करतात. त्यामुळे त्याला बाहेरही काढता येत नाही.’’

श्वानदंशाच्या समस्येबाबत ‘सीविक मिरर’ने पुणे महापालिकेच्या  पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. सारिका फुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘महापालिकेत नोंदवलेल्या श्वानदंशाच्या घटना केवळ महापालिका हद्दीतील नाहीत तर इतर भागातीलही आहेत. नायडू रुग्णालयात दाखल झालेल्या घटनांचाही त्यामध्ये समावेश आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होऊनही कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाळीव कुत्र्यांनी चावण्याच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्ही  मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने देशातून रेबीजचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्याअंतर्गत २०३० पर्यंत शहरातून रेबीजचे संपूर्ण समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.’’

पुणे महापालिकेत ३४ गावे विलीन झाल्यानंतर आव्हाने वाढली आहेत. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी  प्राणीप्रेमी, नागरिकांची मदत घेत आहोत, पण त्यामध्ये आम्हाला मर्यादा आहेत. कारण सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या पिल्लांची नसबंदी करता येत नाही.

- डाॅ. भगवान पवार, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest