संग्रहित छायाचित्र
पुणे : शिक्षण विभागातील वैयक्तिक मान्यतांच्या नोंदी असलेली रजिस्टर चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पोलीसांत तक्रार दिली आहे. शिक्षण विभागात काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गैरव्यवहाराच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर पुरावे नष्ट करण्यासाठी हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात हा प्रकार घडला. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही नोंदणी अत्यंत महत्वाची असते. शिक्षण विभागाच्या 2016 ते 2018 या तीन वर्षांत झालेल्या संचमान्यता शिबिरातील वैयक्तिक मान्यतेच्या नोंदणी या रजिस्टरमध्ये होत्या. एकूण पाच रजिस्टर चोरीस गेली आहेत. ही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला जाण्यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयातील रजिस्टर चोरीला गेल्याने पोलिसात तक्रार करण्यात आल्याचे सांगितले.
शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांवर यापूर्वी विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांची चौकशी सध्या सुरू आहे. त्यासंबंधीचीच कागदपत्रे चोरीला गेली आहेत का हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. ही कागदपत्रे चोरीस गेल्यास हा तपास होणार कसा असा प्रश्न आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.