Pune: तलाठीभरती घोटाळ्याची SIT चौकशी करा; युवक कॉंग्रेस आक्रमक
पुणे : तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसअतिशय आक्रमक झाली असून या घोटाळ्याची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी करावी आणि एमपीएससीच्या सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी वाढीव जागांची नव्याने जाहिरात काढावी या मागण्या संदर्भात युवक कॉंग्रेस पुण्यात उपोषणास बसणार होते. पण पोलिसांनी या उपोषणास परवानगी दिली नाही. त्यानंतर युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्र घेत बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यास सुरुवात केली त्यानंतर लगेच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. (Pune News)
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हे म्हणाले की, "नुकत्याच लागलेल्या या तलाठीभरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ झालाय व मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे वारंवार समोर आले आहे. यामुळे प्रामाणिकपणे वर्षोनुवर्षे अभ्यास करणाऱ्या स्पर्धापरिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत आहे. इतके दिवस आमदार फोडण्यात निष्णात असलेले सरकार आता विविध परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीला संरक्षण देण्यात निष्णात झाल्याचे दिसत आहे. वारंवार तेच आरोपी असताना त्यांच्यावर ठोस अशी कारवाई शासनातर्फे करण्यात आल्याचे कधी दिसून आले नाही. जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्यांची SIT चौकशी होत नाही महाराष्ट्रभर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. "
अक्षय जैन म्हणाले, 210 आमदारांचं समर्थन असलेल्या सरकार करून विद्यार्थ्यांकडे पुराव्याची मागणी करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारला बदनाम करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असे उद्गार राज्याच्या महसूलमंत्र्यांनी काढणे हे अशोभनीय आहे. स्पर्धापरिक्षेबाबत 'सिरीयस' व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. स्पर्धापरिक्षेबाबत सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभाराविरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्यास सरकार हुकूमशाही पद्धतीने मनाई जरी करत असली तरी युवक कॉंग्रेस विद्यार्थ्यांसाठी हा लढा लढणार असल्याचे यावेळी अक्षय जैन यांनी स्पष्ट केले.
स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांच्या अशा विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र युवक काँग्रेस महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या.
या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रवीणकुमार बिरादार, प्रथमेश अबनावे, रोहन सुरवसे, अनिकेत नवले, तारीक बागवान , राहुल शिरसाट, कौस्तुभ नवले, आशुतोष जाधवराव, आनंद दुबे, भूषण रानभरे, अमोल दौंडकर, सौरभ आमराळे,प्रसाद वाघमारे, आशिष व्यवहारे, चंद्रशेखर जाधव, मेघश्याम धर्मावत, अभिजित हळदेकर, निशांत देशमुख, अविनाश साळुंखे, प्रसन्न मोरे विश्वजीत जाधव,भाविका राका, गणेश उबाळे, योगेश यादव, कौस्तुभ पाटील, यांसह युवक कॉंग्रेसचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.