संग्रहित छायाचित्र
पुणे : महामेट्रोने (Mahametro) केवळ मेट्रो स्थानकांच्या वरील रचनेचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्यास सांगितले होते.त्यात गर्डर, खांब आणि पाया यांचा समावेश नाही. महामेट्रोने (Pune Metro) या भागांची तपासणी करण्यास आम्हाला सांगितले नव्हते. त्यामुळे या गोष्टींचा त्यात समावेश नाही. त्यानुसार स्थानकांची केवळ वरील रचना तपासून त्याचा अहवाल आम्ही सादर केला, अशी धक्कादायक माहिती हे स्ट्रक्चरल ऑडिट करणारे सीओईपी (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठातील प्राध्यापक बी. जी. बिराजदार यांनी गुरुवारी दिली.
विद्यापीठाकडून मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील स्थानकांचे अंतिम स्ट्रक्चरल ऑडिट मे महिन्यात करण्यात आले होते. त्याआधी बडतर्फ प्राध्यापक ईश्वर सोनार यांनी केलेले स्ट्रक्चरल ऑडिट वादग्रस्त ठरल्याने ते प्राथमिक असल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली होती. त्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक बी. जी. बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे अंतिम ऑडिट करण्यात आले. त्यात काही प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. बिराजदार यांच्या पथकाने ४ ते ५ दिवस मेट्रो स्थानकांची तपासणी केली होती. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल विद्यापीठाने महामेट्रोकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे महामेट्रोने स्थानके सुरक्षित असल्याचा दावा केला होता.
याच संदर्भात खुलासा करताना प्राध्यापक बिराजदार म्हणाले, "आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करताना संबंधित संस्थेच्या मागणीचा विचार करतो. त्यांनी समाविष्ट केलेल्या गोष्टींचा आमच्याकडून विचार केला जातो. महामेट्रोने स्थानकांच्या वरील भागाची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार केवळ वरील भागाची तपासणी करून आम्ही अहवाल सादर केला. त्यात स्थानकांच्या पायाच्या भागाचा समावेश नव्हता."
" मेट्रो स्थानकांच्या वरील भागाचाच केवळ स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समावेश आहे. त्यात गर्डर, खांब आणि पाया यांचा समावेश नाही. महामेट्रोने या भागांची तपासणी करण्यास आम्हाला सांगितले नव्हते. त्यामुळे या गोष्टींचा त्यात समावेश नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी केले.