कसबा पेठेतील पवळे चौक ते कुंभार वेस दरम्यान ‘जमावबंदी’

पुणे : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्गाह येथील वादाच्या आणि अनधिकृत बांधकामाच्या पार्श्वभूमीवर कसबा पेठेत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

Chota Shaikh Salla Durgah

संग्रहित छायाचित्र

सह पोलीस आयुक्तांनी काढले आदेश : अफवा पसरविणाऱ्या, सोशल मिडियावर चुकीचे मेसेज टाकणाऱ्यांवर बारीक लक्ष

पुणे : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर (Punyeshwar Mahadev Temple) आणि छोटा शेख सल्ला दर्गाह (Chota Shaikh Salla Durgah) येथील वादाच्या आणि अनधिकृत बांधकामाच्या पार्श्वभूमीवर कसबा पेठेत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. तसेच, अफवा पसरविणाऱ्या तरूणांवर गुन्हे दाखल करीत कायदेशीर कारवाई देखील केली. सध्या निवडणुकांचे दिवस असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पवळे चौक ते कुंभार वेस चौकादरम्यान मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) लागू करण्यात आले आहे. सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबाबतचे आदेश काढले. 

पवळे चौक ते कुंभार वेस सार्वजनिक रस्त्यावर तसेच भोई गल्ली, कागदीपुरा, कुंभारवाडा, आलोकनगर सोसायटी व अग्रवाल तालीम येथील सार्वजनिक रस्त्यावर राहणाऱ्या स्थानिक व्यक्तीखेरीज अन्य बाहेरील व्यक्तींना प्रार्थनेकरीता, आरतीकरिता एकत्र येण्यास, या परिसरात प्रवेश करण्यास, याठिकाणी थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच स्थानिक अथवा बाहेरील व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कसबा पेठ भागात पवळे चौक ते कुंभार वेस चौकादरम्यान काही कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याच्या उद्देशाने बाहेरील परिसरातील व्यक्ती एकत्र जमुन प्रक्षोभक बोलणे, आक्षेपार्ह घोषणा देणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे तसेच आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयाच्या व अन्य सामाजिक माध्यमाव्दारे प्रसारीत करुन सामाजिक अस्थिरता, धार्मीक तेढ निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) प्रमाणे आदेश लागू करण्यात आले आहेत. (Section 144 in kasaba peth)

यासोबतच शहरात कुठेही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जातीधर्माच्या दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, वक्तव्य केले जाणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत. जातीय भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केले जाणार नाहीत. तसेच, आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जाणार नाहीत. समाजमाध्यमाचा गैर वापर केला जाणार नाही. विनापरवाना कोणत्याही रॅली, धरणे, मोर्चाचे किंवा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही. असे आदेश बजावण्यात आले आहेत. हे आदेश २८ मार्च मध्यरात्रीपासून १० एप्रिल २०२४ पर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भादवि कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest