कारागृह एक, गोष्टी अनेक! येरवडा कारागृहाच्या भिंतीआतील विश्व - भाग २ : 'जेवणाची हंडी पद्धत'

भारतीय माणसांची जेवणाची वेळ ही सकाळी दहा वाजता असली तरी रात्रीच्या जेवणाची वेळ ही सायंकाळी चार नसते. मात्र, ब्रिटिशांनी त्या काळी पुरेशा विजेची सोय नसल्यामुळे कदाचित सकाळी दहा व सायंकाळी चारची जेवणाची सोय केली असण्याची शक्यता आहे.

संग्रहित छायाचित्र

स्वातंत्र्यापूर्वी पुरेशी वीज नसल्याने ब्रिटिश सरकारने कैद्यांच्या संध्याकाळच्या जेवणासाठी ठरवलेली चारची वेळ अद्यापही कायम, अनेक जण वाटपाच्या वेळी अन्न घेऊन आपल्या सोईनुसार करतात जेवण

भारतीय माणसांची जेवणाची वेळ ही सकाळी दहा वाजता असली तरी रात्रीच्या जेवणाची वेळ ही सायंकाळी चार नसते. मात्र, ब्रिटिशांनी त्या काळी पुरेशा विजेची सोय नसल्यामुळे कदाचित सकाळी दहा व सायंकाळी चारची जेवणाची सोय केली असण्याची शक्यता आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरही ७५ वर्षांनी राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या जेवणाची वेळ ही सकाळी दहा व सायंकाळी चारची आहे. त्यामुळे अनेक कैदी जेवण वाटपाच्या वेळी घेतात आणि त्यांच्या सोईने अर्थात भूक लागल्यानंतर खातात. कारागृहातील जेवण आधीच निकृष्ट दर्जाचे. त्यामध्ये उशिरा जेवण केल्यामुळे ते थंड असते. कारागृहात त्यामुळे हंडी पद्धत आली आहे. ताटाचे भांडे करून त्यात जेवण केले जाते. त्यामध्ये गरजेप्रमाणे मीठ, तिखट, तेल आणि फरसाण टाकून ते चविष्ट केले जाते. त्यासाठी हंडी पद्धत वापरली जाते.

कारागृहात मिळते अवेळी जेवण

कारागृहाची बहुतेक नियमावली आजही ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राबवली जात आहे. कारागृहातील (Yerwada Jail) सकाळ पहाटे पाच वाजता सुरू होते. कैदीसंख्या मोठी असल्यामुळे सकाळी आवरण्याची घाई सर्वांना असते. शौचालय तसेच अंघोळीसाठीचा हौद अतिशय अस्वच्छ असतो. हौदातून बादलीत पाणी भरून चक्क अंगावर ओतून घ्यावे लागते. सकाळी मिळणारा चहा म्हणजे गरम पाण्यासारखा असतो. तर दुपारचे जेवण सकाळी दहा वाजता मिळते. जे पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान बनविलेले असते. तर संध्याकाळी चार वाजता मिळते ते दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान बनविलेले असते. हे जेवण अवेळी असल्यामुळे अनेक कैदी सकाळी दहा वाजता मिळालेले जेवण दुपारी एक ते दीडच्या दरम्यान खातात, तर संध्याकाळी मिळालेले जेवण ते साडेसात ते आठच्या दरम्यान खातात.

काय आहे जेवण गरम करण्याची हंडी पद्धत?

कैद्यांना मिळणारे जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असते, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक कैद्यांकडे तिखट, मीठ, तेल , फरसाण आदी वस्तूंचा साठा असतो. जेवणाच्या ताटाला ते भांड्याचा आकार देतात. त्याला हंडी म्हणतात. कैदी वाटी घेऊन त्यात वृत्तपत्राची रद्दी व प्लॅस्टिकचा वापर करून आग पेटवतात. या वाटीवर हंडी ठेवतात. या हंडीत कारागृहात मिळालेली भाजी गरम करतात. त्यात गरजेप्रमाणे तिखट, मीठ, तेल व फरसाण घालून गरम करतात. शक्य असल्यास कागदाप्रमाणे व अर्धी कच्ची मिळालेल्या चपात्या गरम करून खातात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच कैद्यांना हंडी पद्धतीने खाता येते. इतर असंख्य कैद्यांना कारागृहातील निकृष्ट जेवण खावे लागते.

कारागृहातील सुपर मार्ट भ्रष्टाचाराचे ‘भांडार’

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील भांडार अर्थात सुपर मार्ट आहे. या भांडारात कैद्यांना पाहिजे ती वस्तू सहज मिळते. अर्थात यासाठी कैद्यांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागते. या ठिकाणी कैद्यांना अंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी साबण, टूथ पेस्ट, खोबऱ्याचे तेल किंवा बेकरी उत्पादने, उकडलेली अंडी, दूध, तंबाखू, सिगारेटपर्यंत सर्व दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात.  येथील सर्व नोंदी लेखी असल्यामुळे भ्रष्टाचाराचा कळस असतो. ही यंत्रणा खालच्या अधिकारापासून ते मंत्रालयातील सचिवस्तरापर्यंत पोखरलेली आहे. दैनंदिन कैद्यांना मिळणाऱ्या चहापासून ते जेवणापर्यंतच्या वस्तूंमध्ये मापात पाप करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर धान्य, कडधान्य, किराणा माल, तेल, दूध, तिखटापासून ते मीठापर्यंत किती प्रमाणात येते आणि किती वापरले जाते, याचे काहीच प्रमाण नाही. प्रमाण असले तरी ते काटेकोरपणे तपासले जात नाही. त्यामुळे कैदी कधीच तक्रार करीत नाहीत. एखाद्याने केल्यास त्याला वेगळी शिक्षा कारागृहात भोगावी लागते. त्यामुळे सर्वजण गप्प असतात.

मनीऑर्डरमध्ये भ्रष्टाचार

कारागृहातील परिस्थिती भयंकर असल्यामुळे येथे जगायचे तर पैसे हवेत म्हणून अनेक कैदी मनीऑर्डर मागवत असतात. अर्थातच, या मनीऑर्डरमध्ये मोठा भ्रष्टाचार होतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास एखाद्याला हजार रुपये मनीऑर्डर आली तर त्याच्यापर्यंत चारशे ते पाचशे रुपये पोहोचतात. याबाबत तक्रार केली तर पुढच्या वेळी मनीऑर्डर बंद केली जाते. आता कारागृहात नवीन डिजिटल प्रणाली आल्यामुळे रोकड पैशांचा वापर कमी झाला आहे. तरीसुद्धा कैद्यांचे आर्थिक शोषण येथे होत असते.

कारागृहातील आरोग्य सुविधा

येरवडा मध्यवर्ती कारागृहात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचर आहेत. त्यामुळे दैनंदिन आजारापासून ते साथीच्या आजारावर कैद्यांवर तत्काळ उपचार केले जातात. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिफारशीवरच ससूनसारख्या रुग्णालयात कैद्यांना उपचारासाठी पाठविले जाते. या शिफारशीसाठीसुद्धा मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असते. त्यामुळे येथे गरीब आणि श्रीमंत रुग्णांचे उपचार वेगळे आहेत. ज्याच्याकडे पैसा त्यांना तत्काळ व चांगले उपचार मिळतात. गरीब कैद्यांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते.

"कारागृहातील जेवणाची चव मी घेत असतो. कारागृहातील जेवणाचा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण बनविले जाते. हे पाहता काही तरी कमी-जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही..."

- सुनील ढमाळ अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest