आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदाही विलंब

पुणे: जानेवारी महिना अर्धा उलटून गेला तरी अद्याप शिक्षण हक्क (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पालकांना

RTE

संग्रहित छायाचित्र

हजारो पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता, शिक्षण विभागाने दिलेल्या प्रस्तावाला सरकारकडून नाही अद्याप मंजुरी

पुणे: जानेवारी महिना अर्धा उलटून गेला तरी अद्याप शिक्षण हक्क (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. (RTE)

आरटीईद्वारे प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांना अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. मात्र, आरटीईद्वारे प्रवेश घेतल्यानंतर पालकांनी भरलेली फी संबंधित शाळेकडून त्यांना परत केली जात नाही. यामुळे अनेक पालकांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने लवकरात लवकर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. (Latest Pune News)

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.  त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. साधारणपणे आरटीई प्रवेश प्रक्रिया जानेवारीत सुरू होते. त्यामुळे याबाबत राज्य सरकार कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’कडे प्रतिक्रिया देताना पालक प्रतिनिधी सतीश पाटील म्हणाले, ‘‘आगामी शैक्षणिक वर्षासाठी आम्ही आरटीई प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहोत. मला माझ्या घराजवळील आरटीई शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. गेल्या वर्षी वयामुळे मला फॉर्म भरता आला नाही. परंतु यंदा आजपर्यंत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मागील वर्षी आरटीईचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये घोषित करण्यात आले होते.’’

‘‘आरटीई प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, यावर महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अद्याप एकमत  नाही. कर्नाटक राज्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आरटीई प्रवेश प्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक लागू करता येईल का,  याबाबत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. केवळ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच नव्हे तर इतर माध्यमांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची संख्या वाढवणे शक्य आहे का, या प्रश्नावर भविष्यात सरकारने विचार करायला हवा,’’ अशी सूचना शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद रणधीर यांनी केली.

आप पालक संघाचे समन्वयक मुकुंद किर्दत म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडून दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला उशीर होतो. त्यामुळे पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश कायम ठेवावा लागतो. त्यासाठी शाळेचे शुल्कही भरावे लागते. शाळेत प्रवेश घेतल्यास आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत या पालकांना संबंधित शाळेकडून शुल्क परतावा मिळणार नाही. साधारणपणे सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये पूर्ण होते. त्यामुळे अनेक पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.  त्यामुळे लवकरात लवकर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करावी.’’

याबाबत ‘सीविक मिरर’ने प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ‘‘प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, येत्या काही दिवसांत आगामी वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत घोषणा केली जाईल,’’ अशी माहिती त्यांनी दिली. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest