कुलगुरू, प्र कुलगुरूंच्या पुढाकारातून समेट घडणार !
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) हाॅस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर लिहिल्यानंतर भाजपने काढलेल्या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि अन्य एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून पोलीस आयुक्त, कुलगुरूंच्या उपस्थितीत येत्या शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या संघटनासोबत चर्चा करून सर्वंकष उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे.विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. (SPPU)
काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील हाॅस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर लिहिल्यानंतर भाजपने विद्यापीठात मोर्चा काढला होता.या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि अन्य एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुणे पोलिसांनी 7 ते 21नोव्हेंबर या कालावधीत विद्यापीठात जमावबंदी लागू केली आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आवारात शैक्षणिक पावित्र्य राखणे, वैचारिक स्वातंत्र्यासोबत सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहात विद्यार्थी प्रतिनिधींची कुलगुरू, पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. संघटनेच्या कमाल तीन ते पाच प्रतिनिधींना बैठकीस उपस्थित राहता येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.