संग्रहित छायाचित्र
पुणे: भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर झाला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांची नावे आहेत. महाराष्ट्रातून अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, प्रवक्ते माधव भंडारी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे नावदेखील यादीमध्ये नाही. दिग्गज नेत्यांच्या शर्यतीत अनपेक्षितपणे मेधा कुलकर्णी यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. (Latest News Pune)
कसबा विधानसभेच्या पराभवातून धडा घेत भाजपने अखेर पु्ण्यातून राज्यसभेसाठी ब्राह्मण चेहरा दिला आहे. पुण्यातून राज्य मंत्रिमंडळात विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील आहेत. राज्यसभेसाठी कुलकर्णी यांची वर्णी लागल्यामुळे आता आगामी लोकसभेची उमेदवारी कोथरूडमधून दिली जाईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ जोरदार तयारी करत आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांतून माजी आमदार जगदीश मुळीक हेदेखील स्पर्धेत असल्याचे दाखवून घेत आहेत. काही महिन्यांपासून माजी संघप्रचारक आणि त्रिपुरा विधानसभेच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर हेही तयारी करत आहेत. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. त्यांच्यासाठी देवधर ग्राऊंड तयार करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे हेदेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नव्हते. मात्र, आज तीन नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले होते. तब्बल पाच वर्षांनंतर मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला असून त्यांचे राजकीय पूनर्वसन झाले आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आनंद, समाधान आणि एकनिष्ठेचं फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून भाजपतर्फे विनोद तावडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर या नेत्यांचे अर्ज तयार करण्याचे काम सुरू केलं होतं. यांपैकी अंतिम उमेदवार कोण हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित होणार होतं. पुणे महापालिकेतून नो ड्यूज प्रमाणपत्र घेतल्यानंतर कुलकर्णी यांचे नाव चर्चेत आले होते. हे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केले जाते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अन्य राज्यांमधील भाजपच्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली आहेत. महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते राज्यसभेचे खासदार होण्यासाठी इच्छुक होते. त्यातच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांचेदेखील नाव आघाडीवर होते.
भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नसतानाही मेधाताई या पुणे महापालिकेच्या सभागृहात तीन टर्म नगरसेविका राहिल्या. महापालिकेच्या २००२, २००७ आणि त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीत त्या निवडून आल्या. या काळात त्यांची पक्षात मोठी छाप होती. २०१४मध्ये भाजपला सुगीचे दिवस येताच आणि शिवसेनेसोबत (ठाकरेंची शिवसेना) दोन हात करण्याची वेळ आल्यावर भाजप नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदेंचे आव्हान मोडीत काढत त्या विधानसभेत पोहोचल्या. याच काळात राज्यात फडणवीसांचे म्हणजे, भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि मेधा कुलकर्णी मंत्री होणार असल्याच्या चर्चा झडत राहिल्या. पण तसे काही झाले नाही. नंतर २०१९ मध्ये विधानसभा, नंतर विधानपरिषदेची उमेदवारी त्यांना मिळाली नाही.
गत पाच वर्षात पुण्याच्या राजकारणापासून दूर राहिलेल्या परंतु महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांना चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकादेखील देण्यात आली नव्हती. त्यावेळी मानापमान नाट्य रंगले होते. महापालिकेसह पक्षाच्या कार्यक्रमांमध्येही त्यांना डावलण्यात आले होते. त्यावेळी कुलकर्णी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यांनी संयम बाळगला महिला मोर्चाच्या माध्यमातून दिल्लीतील नेत्यांचा विश्वास जिंकला. याची परिणती त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीतून झाली आहे.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये टिळक घराण्यातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात त्यांचा दारूण पराभव झाला. भाजपकडून ब्राह्मणांना गृहित धरले जात आहे, त्यामुळेच उमेदवारी दिली नाही, अशी भावना ब्राह्मण समाजात निर्माण झाली. त्याचा फटकादेखील या निवडणुकीमध्ये बसल्याने रासने यांचा पराभव झाला, असे मानले जाते. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारून मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना येथील ब्राह्मण समाजामध्ये आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्या रुपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ब्राह्मण चेहरा देत नाराजी दूर करण्याची संधी साधली आहे. मात्र याचा अंतिम निर्णय १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असली तरी बहुमत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार पुणे लेाकसभेसाठी केल्या गेलेल्या गोपनीय सर्वेक्षणांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या नावाला पसंती िमळाल्याची मािहती समोर आली आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांच्या यादीत जयशंकर यांचे नाव आल्यास आर्श्चय वाटायला नको. याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.