रजत कुलकर्णी यांच्या गायनाने सवाईच्या तिसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध गाजवला

'सवाई'च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर या युवा गायकाने प्रथमच संगीतसेवा रुजू केली.

SawaiGandharvaBhimsenfestivalday3

रजत कुलकर्णी यांच्या गायनाने सवाईच्या तिसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध गाजवला

मधुवंती रागात त्यांनी 'हू तो तोरे कारन' हा ख्याल मांडला. 'एरी आयी कोयलिया बोले' या द्रुत बंदिशीतून त्यांच्या तयारीचे, लयकारीचे दर्शन घडले. रजत यांनी पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली म्हणून कन्नड भजन सादर केले. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी 'सावळे सुंदर रूप मनोहर' हा तुकाराम महाराजांचा अभंग अतिशय तन्मयतेने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), माऊली टाकळकर आणि वसंत गरूड (टाळ), वीरेश संकाजी व मोबीन मिरजकर (तानपुरा) यांनी साथ केली.

त्यानंतर ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी सरस्वती रागात 'पिया बिन मोहे' ही बंदिश रूपक तालात सादर केली. तसेच 'माते सरस्वती ' ही स्वरचित बंदिश तीनतालात पेश केली. पद्माताईंनी 'गोपालसारंग' या रागाची निर्मिती केली आहे. या रागात त्यांनी 'संग लीनो बालगोपाल' ही बंदिश त्रितालात सादर केली. हा नवा राग देस राग आणि वृंदावनी सारंग या रागांच्या मिश्रणातून त्यांनी तयार केला आहे. मिश्र पहाडी मधील 'घिर घिर बदरा काले छाये' ही कजरी सादर करून पद्माताईंनी विराम घेतला. त्यांना डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनियम), रामकृष्ण करंबेळकर (तबला) आणि श्रुती देशपांडे व ऐश्वर्या देशपांडे यांनी स्वरसाथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धात सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारीच्या झंकारांनी स्वरमंडपात चैतन्यलहरी उसळल्या. सवाईच्या मंडपात रसिकांची हाऊसफुल्ल गर्दी सतारवादक पं. नीलाद्रीकुमार यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती. स्वरमंचावरील त्यांच्या आगमनाची श्रोत्यांना उत्सुकता होती. जगविख्यात सतारवादक पं. रविशंकर रचित 'यमन मांझ' रागाने नीलाद्रीकुमार यांनी वादनाला आरंभ केला. घराण्याची शिस्त न मोडता स्वत:ची पूर्णपणे स्वतंत्र शैली नीलाद्रीकुमार यांनी विकसित केली आहे. विलंबित लयीवर कमालीचे प्रभुत्व दर्शवणाऱ्या त्यांच्या वादनाने सुरवातीपासूनच श्रोत्यांच्या मनाची पकड घेतली. राग पंडित राविशंकर यांचा, पण राग विचार आणि रागमांडणी नीलाद्री यांची स्वतःची असल्याने त्यांच्या वादनाने स्वरमंडपात चैतन्य निर्माण केले. प्रत्येक आवर्तनाला रसिक टाळ्यांचा कडकडाट करत दाद देत होते.

वादनाच्या अखेरीस नीलाद्रीकुमार यांनी रसिकांच्या आग्रहाला मान देत धून पेश केली. याचवेळी स्वरमंडपात ज्येष्ठ सतारवादक, नीलाद्रीकुमार यांचे गुरू आणि वडील पं. कार्तिककुमार यांचे आगमन झाले. त्यांचे आगमन होताच नीलाद्रीकुमार यांनी 'बाबांनी लहानपणी शिकवलेली धून सादर करतो' असे सांगून एक छोटेखानी रचना पेश केली. त्यांच्या वादनाला सत्यजीत तळवलकर यांनी अतिशय पूरक अशी तबलासाथ करून मैफलीची रंगत वाढवली.

यावेळी संवाद साधताना नीलाद्री कुमार म्हणाले, "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव  हा माझ्यासाठी केवळ मंच नाही तर मंदिर आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला मंदिरात जातो तसा मी येथे येतो. मी जगभरात, भारतभर सादरीकरण करतो मात्र सवाई सारखा महोत्सव आणि पुण्यासारखे रसिक श्रोते कोठेच नाहीत. आज माझे वडील देखील येथे मला ऐकायला आले हे माझ्यासाठी सरप्राईज होते. श्रीनिवास जोशी यांनी ते येत आहेत म्हणून मला १५ मिनिटे वेळ वाढवून दिली ती का दिली हे माझे वडील आल्यावर समजले.

"नीलाद्री कुमार यांच्या सादरीकरणानंतर बोलताना पं कार्तिककुमार म्हणाले, "मी खूप वर्षांआधी माझ्या गुरुंसोबत सवाईमध्ये सादरीकरण केले आहे. मात्र नीलाद्री सोबत येथे सादरीकरण केलेले नाही. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा अमर आहे असे मी मानतो." भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, पं भीमसेन जोशी यांचे संगीत अमर होते.नीलाद्रीला मिळत असलेले रसिकांचे प्रेम आणि आशीर्वाद असाच पुढेही मिळत राहो अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest