‘पुणेकर निकषापेक्षा जास्त पाणी वापरतात'; आयुक्तांच्या विधानाने पुणेकर संतापले!

पाण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पुणेकरांना रात्री-अपरात्री जागे राहावे लागत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी भरता भरता उजाडते. तरीही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. वापरण्यासाठी टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे.

‘पुणेकर निकषापेक्षा जास्त पाणी वापरतात'; आयुक्तांच्या विधानाने पुणेकर संतापले!

पाण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पुणेकरांना रात्री-अपरात्री जागे राहावे लागत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी भरता भरता उजाडते. तरीही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. वापरण्यासाठी टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांचे वाद होत आहेत. त्यातच नवे महापालिका आयुक्त डॉ. राजेद्र भोसले (Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale) यांनी पुणेकर जास्त पाणी वापरतात असे विधान केल्याने पुणेकर भडकले आहेत. आयुक्त नवे असल्याने त्यांना वास्तवाची जाणीव नसावी. त्यांच्या बंगल्यावर मुबलक पाणी येते, त्यामुळे ते कधी पाण्यासाठी रात्री जागे राहिले नाहीत, अशा शब्दात हडपसरच्या नेहा मुळे यांनी पुणेकरांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

दिवसाला एका व्यक्तीला १५० लिटर पाणी वापरण्यासाठी मिळावे असे गृहीत धरण्यात आले आहे. मात्र पुण्यात प्रतिव्यक्ती दिवसाला २७० लिटर पाणी वापरले जाते. त्याच्या आधारे पुणेकर हे जास्त पाणी वापरतात, असे वक्तव्य आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी केले. या विधानावरून पुणेकर संतापले आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाण्याचा वाढीव कोटा मागणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सध्या पुणेकर निकषापेक्षा जास्त पाणी वापरतात. तसेच धरणातील पाण्यावर केवळ पुणेकरांचा हक्क नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते. आयुक्तांच्या विधानाने पुण्याला पाण्याचा वाढीव कोटा मिळण्याची आशा धुसर झाली आहे. याबाबत अनेक पुणेकरांनी ‘सीविक मिरर’ कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पुणेकर महापालिकेला (Pune Municipal Corporation) नियमितपणे कर भरतात. त्या बदल्यात तेवढ्या सुविधा दिल्या जात नाहीत. पुणेकरांचे हक्काचे पाणी बारामती, दौंडसह इतर तालुक्याला जाते. त्यावर आयुक्त काही बोलत नाहीत. पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात जलंसपदा विभागाकडून पाण्याचा कोटा वाढवून दिला जात नाही. त्याचा विचार करण्यापेक्षा पुणेकरांच्या पाण्याचे मोजमाप आयुक्त करत आहेत.आयुक्तांनी आपण वापरत असलेल्या पाण्याचे मोजमाप जाहीर करावे. - आशिष मगर, नागरिक.

पालिका कर भरूनदेखील सोयी सुविधा मिळत नाहीत. करवसुलीसाठी लोकांच्या घरासमोर बँड वाजवला जातो. त्याच घराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. आमच्या घरापर्यंत जोडलेल्या पाईपलाईनला अतिशय कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. अशा स्थितीत आयुक्त कोणत्या आधारावर पुणेकर निकषापेक्षा अधिक पाणी वापरतात असे विधान करतात. आधी पुरेशा प्रमाणात आणि समान पाणी पुरवठा करा, मग निकषावर बोला. - प्रिया गाजरे, महिला नागरिक

आमच्यावर पाणी टंचाईचे संकट आहे. उन्हाळ्यात पुरेसा पुरवठा होत नाही, हे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. शहरातील बांधकाम प्रकल्पांना किती पाणी लागेल याची कोणतीह मोजणी केलेली नाही.  - अमित अभ्यंकर- सहकार नगरचे रहिवासी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest