पुणे: 'कारच्या धडके'ने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

खडकवासला धरण परिसरातील विद्युत खांबाला एका कार चालकाने जोराची धडक दिल्याने या भागातील वीज पुरवठा पाच तासांसाठी खंडीत झाला होता. यामुळे खडकवासला धरणातून महापालिकेच्या वारजे आणि नवीन पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा वीज पुरवठा सोमवारी (दि. २९) तब्बल साडेपाच तास खंडित झाला होता.

'कारच्या धडके'ने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

खडकवासला धरण परिसरातील विद्युत खांबाला कारचालकाची जोरात धडक; वारजे आणि नवीन पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा वीजपुरवठा पाच तास खंडित

खडकवासला धरण परिसरातील विद्युत खांबाला एका कार चालकाने जोराची धडक दिल्याने या भागातील वीज पुरवठा पाच तासांसाठी खंडीत झाला होता. यामुळे खडकवासला धरणातून महापालिकेच्या वारजे आणि नवीन पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा वीज पुरवठा सोमवारी (दि. २९) तब्बल साडेपाच तास खंडित झाला होता.

शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा विस्ळकीत झाल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला. मात्र वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत झाला. मंगळवारपासून नियमितपणे पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

खडकवासला रॉ वॉटर जॅकवेल पम्पिंग येथील महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठा करणाऱ्या पोलला सकाळी सव्वाअकरा वाजता एका भरधाव चार चाकीने जोराची धडक दिली. या धडकेत हा पोल पडला. त्यामुळे महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठा यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पंप सव्वाअकरापासून बंद पडले.

ही माहिती मिळताच महावितरणकडून तत्काळ खांब उभारण्यासह वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, वारजे जलकेंद्राचा पंप सुरू होण्यास चार वाजले तर साडेचार वाजता पर्वती जलकेंद्राचे पंप सुरू झाले. त्यानंतर, महापालिकेने पुन्हा पाणी घेण्यास सुरूवात केली. टाक्यांमध्ये आवश्यक पाणी आणि पुढील प्रक्रिया करण्यासह सहा वाजेपर्यंत वेळ गेला. परिणामी, दुपारचे पाण्याचे सर्व वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे महापालिकेने अनेक भागात सायंकाळी उशीरा पाणी दिले असून मंगळवारपासून (दि. ३०) वेळापत्रकाप्रमाणे पाणी येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

खडकवासला धरणातून महापालिकेच्या वारजे आणि नवीन पर्वती जलकेंद्राला कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे या जसशुद्धीकरण केंद्राला कच्चे पाणी कमी पडले होते. मात्र पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रातून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर अनेक भागात पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे वाढल्या होत्या. नागरिकांना पाणी मिळावे यासाठी ज्या भागात उशीराने पाणी आले त्या भागात अतिशय कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणी देण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजता हा वीज पुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी चारनंतर तो सुरळीत झाला. प्रामुख्याने लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या पूर्व भागात तसेच वारजे आणि पर्वती जलकेंद्रातून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाला सर्वाधिक फटका बसला.

मोदी आले अन् पाणी गेले...

लोकसभा निवडणुकीचे पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी हडपसर रस्त्यावरील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहराला सोमवारी पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. दिवसभर मोदींच्याच सभेची चर्चा रंगलेली असताना शहरातील अर्ध्या भागातील पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिक हैराण झाले होते. वेळापत्रकानुसार पाणी येईल, याची वाट बघत नागरिकांना दिवस पाण्याविना काढावा लागला. मोदींच्या सभेमुळे रस्त्यावर गर्दी असणार असे गृहीत धरत अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. दिवसभर घराबाहेरही पडता न आल्याने मोदी आले अन् पाणी गेले, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.

शहराच्या पूर्व भागासह बाणेर, बालेवाडी भागातही पाणी बंद

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारित सिंहगड रोड परिसर तसेच लष्कर जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारित रामटेकडी, हडपसर, मुंढवा, वानवडी, संपूर्ण कोंढवा, खराडी, कॅम्प, येरवडा व खडकी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर या भागात संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून संपूर्ण कोथरूड परिसर, वारजे माळवाडी परिसर, बाणेर, बालेवाडी, बावधन व पाषाण परिसर, कर्वे रोड परिसर, चतु:श्रुंगी, औंध, गणेशखिंड, शिवाजीनगर, गोखले नगर, प्रभात रोड भागातील पाणीपुरवठा बंद होता. सोमवारी पाणी न आल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ आली. रहिवासी सोसायटयांना खासगी टॅंकर बोलवावा लागला.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest