कारागृह एक, गोष्टी अनेक! येरवडा कारागृहाच्या भिंतीआतील विश्व
येरवडा कारागृह हे आशिया खंडातील दुसरे मोठे कारागृह आहे. कारागृह अतिशय सुरक्षित समजले जाते. मात्र, काही वर्षांपूर्वी दहशतवादी कतिल सिद्दीकीचा खून येथे झाला होता. कारागृहात अनेक टोळी युद्ध होतात. यामध्ये अनेकजण गंभीर जखमीही होतात. आता कारागृहात तब्बल नऊशे सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. तरीही यंत्राच्या, मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात येतात. राज्यातील येरवडा कारागृहावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासाठी मोठा गाजावाजा करून ड्रोन खरेदी केली होती. मात्र, हा प्रयोग पूर्णत: फसल्याचे दिसून येते. कारण, गेल्यावर्षी खरेदी केलेले ड्रोनचे उड्डाण झालेच नाही.
येरवडा मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील सहा मध्यवर्ती कारागृहात दोन हजार ३९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. इतर दहा कारागृहांमध्ये तीन हजार ८२२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी कारागृहात मनुष्यबळ कमी असल्यामुळे कैद्यांवर नियंत्रण ठेवण्यावर मर्यादा येतात. कॅमेरे जरी असले तरी एकाद्यावेळी कैद्यांमध्ये भांडण झाले तर त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. कारागृहातील शेकडो तुरूंग रक्षकांच्या जागा रिक्त आहेत. प्रत्येक कारागृहात डझनभर तुरूंगाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहरात गेल्या तीन ते चार वर्षांत पोलीसांनी मोक्का कारवाई करुन सातशेपेक्षा जास्त गुंडांची कारागृहात रवानगी केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात शहर शांत झाले असले तरी या गुंडांनी कारागृहात धुडगुस घातला आहे. त्यामुळे कारागृहात नवीन व जुने असे दोन गट पडून टोळी युद्धांचे प्रसंग घडत आहेत.
कारागृहातील कैद्यांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी व आतील टोळी युद्ध, बेकायदा कृत्यावर लगाम घालण्यासाठी ड्रोन खरेदी करण्यात आले होते. मोठा गाजावाजा करून ड्रोनचे प्रात्यक्षिकेही घेण्यात आले होते. मात्र येरवड्यातील ड्रोनचे टेकॲाफच झाले नाही. याबाबत हवाई दलाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. येरवड्यासह राज्यातील कारागृहात टोळी युद्धाच्या घटना घडतात. कारागृहातील कैदी संख्येचा विचार करता अनेक वेळा कारागृहात हाणामारीच्या घटना घडतात. कधी मोबाईल सापडतात तर कधी अंमली पदार्थ सापडण्याच्या घटना घडतच असतात. त्यामुळे कारागृहातील कैद्यांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन खरेदी केले होते. या ड्रोनचे प्रात्यक्षिक सुद्धा झाले होते. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृहावर ड्रोनची नजर ठेवण्यात येणार होती. मात्र, त्याने टेकॲाफ घेतले नाही.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचा परिसर ६५ एकरांचा आहे. या संपुर्ण परिसरावर ड्रोनची गस्त महत्वाची ठरणार होती. कैद्यांच्या भांडणावर नियंत्रण व इतर बेकायदा कृत्यावर निर्बंध घालण्यात येणार होते. मात्र,ड्रोन उडविण्यासाठी हवाई दलाची परवानगीची आवश्यकता होती. त्याबाबत पाठपुरावा कारागृह प्रशासनाने केला नाही. राज्यातील कारागृहांपैकी येरवडा कारागृहात ड्रोन कॅमे-याची गस्त हा प्रायोगिक प्रकल्प होता. मात्र ड्रोन खरेदी करून उपयोग झाला नाही. यासाठी ड्रोन चालविण्याचे तंत्र, त्यानंतर ड्रोनची देखभाल, दुरूस्ती करणारे मनुष्यबळ कारागृहाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाचा ड्रोनचा प्रायोगिक प्रकल्पच फसला आहे.
‘सीसीटीव्ही’ चे बॅकअप
राज्यातील कारागृहात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमे-यांची एकुण किंमत २३ कोटी रूपये आहे. दुस-या टप्प्यातील कॅमे-यांची किंमत ६७ कोटी रूपये आहे. कॅमे-यांचा बॅकअप तीन महिन्यांचा आहे. कॅमेरे ज्या संस्थेने बसविले आहेत ती संस्था पुढील पाच वर्ष सर्व कॅमे-यांची देखभाल व दुरूस्ती करणार आहे.