पुणे: मधुमेही चाचणीसाठी ‘माधवबाग’ची ‘मिठी छुरी!’; अनैतिक जाहिरात केल्याचा 'एमएपीपीएम'चा आरोप

मधुमेही रुग्णांना ‘डायबेटिक फ्रेंडली आटा’ खरेदी करण्याचे आमिष दाखवत ‘माधवबाग’कडून (Madhavbaug ) वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मानकांचे उल्लंघन केल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टने (एमएपीपीएम/MAPPM) केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 30 Apr 2024
  • 11:37 am
Madhavbaug

अनैतिक जाहिरात केल्याचा 'एमएपीपीएम'चा आरोप

डायबेटिस फ्रेंडली आटा हवाय? मग मधुमेहाची चाचणी करण्याची जाहिरातबाजी

नोझिया सय्यद 

मधुमेही रुग्णांना ‘डायबेटिक फ्रेंडली आटा’ खरेदी करण्याचे आमिष दाखवत ‘माधवबाग’कडून (Madhavbaug ) वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मानकांचे उल्लंघन केल्याचा आरोप  महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टने (एमएपीपीएम/MAPPM) केला आहे.

‘माधवबाग’ नावाने आयुर्वेदिक रुग्णालयाची ही साखळी संपूर्ण भारतात चुकीच्या पद्धतीने रुग्णांना जाहिरातीच्या आमिषाने भुलवत असल्याचा एमएपीपीएमचा आरोप आहे.

‘माधवबाग’ जीवनशैलीशी संबंधित आजारांवर विशेषत: मधुमेह आणि हृदयाच्या आजारांवर उपचार करण्याचा दावा करते. त्यांनी एक  कथित ग्लूटेन-मुक्त पीठ खरेदी करण्यास प्रलोभित करणारी एक जाहिरात केली आहे. हे पीठ मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  एमएपीपीएमचे कार्यकारी सदस्य डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘‘पीठ विकत घेण्याच्या माध्यमातून लोकांना मधुमेह आहे की नाही, हे तपासण्यासाठी चाचण्या करून घ्या असे ते सांगत आहेत. अशा प्रकारची जाहिरातबाजी पूर्णपणे अनैतिक आहे,’’ असा दावा डॉ. कुलकर्णी यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केला.   एमएपीपीएमचे राज्य अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनीही या आरोपाला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘अशा प्रकारची जाहिरातबाजी स्पष्टपणे वैद्यकीय आचारसंहितेचे उल्लंघन करते. कोणत्याही डॉक्टर किंवा रुग्णालयाला  अशा पद्धतीने जाहिरात करण्याची परवानगी नाही. मधुमेह चाचण्यांसाठी अशा प्रकारे ऑफर देणे पूर्णपणे अनैतिक आहे.’’

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष  डॉ. दिलीप सारडा म्हणाले, ‘‘लोकांनी आवश्यक वाटले तरच  केवळ पात्र डॉक्टरांमार्फत निदान चाचण्या कराव्या.’’

पीठ विकत घेऊन रुग्णांना चाचण्या घेण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावर माधवबाग केंद्रांच्या साखळीचे संस्थापक डॉ. रोहित साने म्हणाले, ‘‘त्यात गैर काय आहे? उलट त्यामुळे  प्री-डायबेटिक व्यक्तींना लवकर उपचार मिळू शकतात. ग्लूटेन स्वादुपिंडाचे नुकसान करते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते, याची अनेकांना माहिती नसते.  मधुमेहावर उपचार करणारे अनेक डॉक्टर साखरेची पातळी वाढू नये किंवा मधुमेह उलटू नये, यासाठी ग्लूटेनच्या सेवन करू नका, असा सल्ला देतात.’’

‘सीविक मिरर’ने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा अनैतिक जाहिराती खपवून घेणार नसल्याचे सांगितले.

जाहिरात कायदेशीर असल्याचा ‘माधवबाग’चा दावा

‘सीविक मिरर’ने माधवबाग केंद्रांच्या साखळीचे संस्थापक डॉ. रोहित साने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आमचे संपूर्ण भारतातील ३६० केंद्रांचे जाळे आहे. आत्तापर्यंत १० लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यापैकी ७५ टक्के रुग्णांचे परिणाम सकारात्मक आहेत. त्यांची मधुमेहाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप म्हणजे जीवनशैलीच्या माध्यमातून आजारांवर उपचार करण्याच्या आमच्या उपक्रमांना बाधा आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही देशभरात मधुमेहाशी लढा देत आहोत. आम्ही ही जाहिरात  वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नव्हे तर कॉर्पोरेट संस्था म्हणून प्रसिद्ध केली आहे. हे पूर्णपणे कायदेशीर आहे.’’

 रुग्णांचेच प्रबोधन होणे गरजेचे

रुग्ण अधिकारासाठी काम करणारे  डॉ. अनिरुद्ध मालपाणी म्हणाले, ‘‘अशा जाहिरातींमुळे रुग्णांची फसवणूक होते. डॉक्टर किंवा कंपन्या या जाहिराती बंद करण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे रुग्णांचेच प्रबोधन होणे गरजेचे आहे. रुग्णांनी त्यांचे अधिकार ओळखून डॉक्टरांना प्रश्न विचारले पाहिजे. अशा प्रकारच्या चाचण्यांची आवश्यकता आहे का? आहारात विशिष्ट खाद्यपदार्थ समाविष्ठ करण्याची आवश्यकता आहे का, याची माहिती स्वत:हून घेतली पाहिजे.’’ 

"या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. रुग्णांना निदान चाचण्यांकडे आकर्षित करणाऱ्या अनैतिक जाहिराती खपवून घेतल्या जाणार नाहीत."
- धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest