पुणे: शहरात आणखी दोन गर्भवतींना झिकाचा संसर्ग

शहरात झिकाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. झिकाचा संसर्ग गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे, असे असतानाच सोमवारी येरवड्यातील गर्भवतीनंतर मंगळवारी (दि. ९) आणखी दोन गर्भवती महिलांसह एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली.

Pune News, Zika, Zika Disease Pune, Pune Municipal Corporation, Pregnant Women

संग्रहित छायाचित्र

झिकाबाधित गर्भवतींचे प्रमाण वाढत असल्याने चिंता वाढली, पुण्यातील रुग्णसंख्या पोहोचली १५ वर

पुणे: शहरात झिकाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. झिकाचा संसर्ग गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे, असे असतानाच सोमवारी येरवड्यातील गर्भवतीनंतर मंगळवारी (दि. ९) आणखी दोन गर्भवती महिलांसह एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली.

पाठोपाठ झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांची नोंद होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची काळजी वाढली असून गर्भवती महिलांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच महापालिकेकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.  शहरातील झिकाबाधित रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. यात आठ गर्भवतींचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बावधन भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरात १५ वर्षीय तरुणाला झिका संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाषाण परिसरात १८ वर्षीय आणि १९ वर्षीय या दोन गर्भवतींनाही झिकाच्या संसर्गाचे झाल्याचे निदान झाले आहे. यातील १८ वर्षीय महिला ही २८ आठवड्यांची गर्भवती असून तिच्यामध्ये सांधेदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळून आली आहेत.  १९ वर्षीय महिला ही २३ आठवड्यांची गर्भवती आहे. तिच्यामध्ये घसा खवखवण्याची लक्षणे दिसून आली आहेत. सध्या या दोन्ही गर्भवतींची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील गर्भवती महिलांची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

रुग्णसंख्येत गर्भवती महिलांना झिका विषाणूचा अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. शहरात आतापर्यंत आठ गर्भवतींना झिकाचे निदान झाले आहे. यात एरंडवणे परिसरातील दोन, पाषाण परिसरातील तीन, मुंढवा, आंबेगाव बुद्रुक आणि कळस परिसरातील एका महिलेचा समावेश आहे. झिका विषाणूमुळे गर्भवतींची मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात, बाळामध्ये जन्मत: दोष उद्भवणे यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भवतींमधील हा धोका टाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवतींचे सर्वेक्षण आणि संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून आज मुंढवा, पाषाण, खराडी आणि कळस परिसरातील ३१ महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत.

महिलांना जास्त धोका
शहरात आतापर्यंत झिकाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत. यात पुरुष रुग्णांची संख्या केवळ चार आहे. तर महिला रुग्णांची संख्या ११ असून यात आठ गर्भवतींचा समावेश आहे.

कीटक प्रतिबंधक विभागाकडून आळीनाशक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गर्भवती महिलांचे समुपदेशन केले जात आहे. खासगी रुग्णालयात असे रुग्ण आढळून आल्यास तत्काळ महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे.
  - डॉ. कल्पना बळिवंत, आरोग्य प्रमुख, प्रभारी.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest