पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
पुणे पोलिसांनी बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शुक्रवारी पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. इतर दोन आरोपींची माहिती मिळाली असून ते देखील लवकरच सापडतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्राथमिक चौकशीत हे आरोपी अतिशय सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, या आरोपींनी कुठलाही डिजिटल पुरावा मागे राहू नये याची काळजी घेतली होती. परंतु पोलिसांनी मोठ्या प्रमाणात टिम्स तयार केल्या होत्या. जवळपास ७०० पोलीस आरोपींचा शोध घेत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर होते. पोलीस आयुक्तालय, पुणे शहरअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या ७२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या ७ पोलीस ठाण्यांचे उद्घाटन, पोलीस आयुक्तालयात २००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, पोलीस आयुक्तालयाच्या व बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची उभारणी इत्यादी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.
शहरात नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन, २६०० नवीन कॅमेरे असलेल्या सीसीटीव्ही फेज २ चा शुभारंभ, पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाणे , पिंपरी-चिंचवड मध्ये चार पोलीस ठाणे, मीरा भाईंदरमध्ये दोन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन, फॉरेन्सिक विभागाच्या संगणकीकरणाचा शुभारंभ, पिंपरी-चिंचवडला नवीन आयुक्तालय तयार करण्याकरता ५० एकर जमीन देण्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच, यामाध्यमातून पोलिसिंगमध्ये बदल करत आहोत. १९६० नंतर पहिल्यांदाच २०२३ मध्ये पोलिसांसाठी नवीन आकृतिबंध तयार केला आहे. त्यामध्ये लोकसंख्येचे निकष बदलले आहे. तसेच पोलिसांमध्ये आधुनिकीकरण आणण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.