संग्रहित छायाचित्र
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पब कल्चर दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिस आणि महापालिकेच्या कारवाईनंतरही अनेक पब्स रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करत सुरू असल्याचे पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागतासाठी पुण्यात एका पबने अनोख्या पद्धतीने पार्टीचे निमंत्रण पाठवले आहे.
मुंढवा येथील 'हाय स्पिरिट कॅफे' या पबने आपल्या नियमित ग्राहकांना नववर्षाच्या पार्टीसाठी पाठवलेल्या निमंत्रणासोबत कंडोम आणि ओआरएसचे पाकीट पाठवल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली असून सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी या प्रकाराबाबत पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत जैन यांनी म्हटले आहे, "पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्राल ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे."
या घटनेनंतर पब कल्चरबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शहरातील लोक यावर नाराजी व्यक्त करत आहेत.