'पुरुषोत्तम'मध्ये यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा...

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‌‘यात्रा‌’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 12:00 pm
Purushottam Karandak, civic mirror, Maharashtra Kalaopasak

संग्रहित छायाचित्र

महाअंतिम फेरीत ‌‘यात्रा‌’ने मारली बाजी, ‌‘कलम ३७५’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‌‘यात्रा‌’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक शहाजी विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‌‘कलम ३७५’ या एकांकिकेने पटकावला. या संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच स्पर्धकांनी ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’, ‌‘ज्योतीबाच्या नावाने चांगभलं‌’, ‌‘उद गं आई उद‌’ अशा आरोळ्या देत एकच जल्लोष केला. सांघिक प्रथम आणि प्रायोगिक एकांकिकेसाठी पारितोषिक पटकाविणाऱ्या कोल्हापुरातील संघांचा आवाज दणाणला. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. २७ ते दि. २९ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण १८ संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. २९) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री मनोज जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक सुषमा देशपांडे, अनिल दांडेकर, वैभव देशमुख मंचावर होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या ‌‘पाटी‌’ या एकांकिकेस श्रीराम करंडक, तर सांघिक तृतीय आलेल्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.

 परकाया प्रवेशासाठी भाषेवर प्रभुत्व हवे : मनोज जोशी

भारतीय रंगभूमीवरील पुरुषोत्तम योग म्हणजे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करून मनोज जोशी स्पर्धकांशी संवाद साधताना म्हणाले, नाटक हे प्रत्येक कलेचे मिश्रण आहे. एकांकिका स्पर्धांना सीरिअलमध्ये जाण्याची पायरी मानू नका. अभिनयाच्या ताकदीतून रसोत्पत्ती निर्माण करण्यासाठी नाटक पाहणे, तालीम करणे आणि सतत वाचत राहणे गरजेचे आहे. हे त्रिगुण साधल्यास संगीत, नेपथ्य बाजूला पडून अभिनयाद्वारे कलाकार रंगभूमीवर यश प्राप्त करू शकतो. माझ्यासाठी नाटक हे नुसते गंगास्नान नव्हे तर प्राणवायू आहे. भारतात कुठेही अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली जात नसावी. त्यामुळे मुंबईत वाढलेल्या मला पुरुषोत्तम स्पर्धेत भाग घेता आला नाही याचे कायम दु:ख वाटत राहील. आज-काल आपण समृद्ध भाषा विसरत चाललो आहोत. शब्द भांडार कमी होत आहे. अशा परिस्थितीत भाषा आणि संस्कृतीचे देणे-घेणे वाढविण्यासाठी मिळेल त्या साहित्यकृती वाचत राहा. भाषेचा प्रकार अवगत नसेल, त्याचे ज्ञान नसेल तर वाचिक अभिनय करणे शक्य नाही. तसेच भूमिकेत शिरण्यासाठी परकायाप्रवेश करताना भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. नाटकात काम करताना इमानदारीत काम करा, नटेश्वराला संपूर्ण समर्पित झाला तर तो नक्कीच प्रसन्न होतो. नाटकाचे संस्कार असल्यास पुढील आयुष्यात सांघिक शक्ती, समर्पण भाव, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते आणि तुम्ही उत्तम माणूस बनता.  

उत्तम संवादफेक आवश्यक : सुषमा देशपांडे

परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे म्हणाल्या, एकांकिकेची निवड करताना मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे. अनेक नाटके वारंवार बघितली पाहिजेत. यातून विषयाची निवड करणे सुकर होते. एकांकिका व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून वापरा. नाटकातील प्रोजेक्शनचा अर्थ समजून घ्या. तंत्रावर अवलंबून न राहता शब्द, भावना पोहोचण्यासाठी उत्तम संवादफेक असणे आवश्यक आहे. नाटकाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी नक्कीच होतो.

Share this story

Latest