संग्रहित छायाचित्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तसेच विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या परिसरात कोणत्याही सभा, बैठका, आंदोलने व तत्सम कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची आठ दिवस आधी पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
डॉ. भाकरे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, अहिल्यानगर उपकेंद्र व नाशिक उपकेंद्र येथे कोणत्याही स्वरुपाच्या सभा, बैठका, आंदोलने व तत्सम कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा, बैठका, आंदोलने व तत्सम कार्यक्रम/उपक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच विद्यापीठ आवारामध्ये विविध संघटना, विद्यार्थ्यांच्या सभा, आंदोलने, धरणे, उपोषणे व पथनाट्य या अनुषंगिक यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले विद्यापीठ परिपत्रक क्र.५९/२०१८, जा.क्र.एएन/१२७४, दि.२७/०३/२०१८ प्रमाणे सर्व नियम व अटी लागू राहतील, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.