Pune Air Quality : ‘एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स’ची माहिती जाहीर करा; विवेक वेलणकर यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : महापालिकेच्या हद्दीत कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी मिशन तर्फे ४५ एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स बसविण्यात आले होते. या सेन्सर्समधून उपलब्ध होणारी माहिती रोजच्या रोज महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 30 Dec 2024
  • 07:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : महापालिकेच्या हद्दीत कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी मिशन तर्फे ४५ एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स (Air Quality Index Sensors) बसविण्यात आले होते. या सेन्सर्समधून उपलब्ध होणारी माहिती रोजच्या रोज महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 

याविषयी वेलणकर (Vivek Velankar) वायू प्रदूषणात पुणे शहराचा क्रमांक संपूर्ण भारतात फार वर आहे. यातून नागरीकांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. पुण्यातील हवेची गुणवत्ता वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे याचा वेध घेण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ‘एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स’ बसवण्यात आले आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होते अशा तक्रारी असल्याने वैकुंठापासून एक किलोमीटर परिसरात रहिवाशांच्या इमारतीवर पुणे स्मार्ट सिटी तर्फे दोन  ‘एक्यूआय सेन्सर्स’ बसवण्यात आले आहेत. आता स्मार्ट सिटी कडील सर्वच यंत्रणा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. 

त्यामुळे हे ‘एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स’ महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात आले आहेत. वेलणकर हे मागील महिन्यापासून या ‘एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स’मधून उपलब्ध होणारा डाटा मिळावा तसेच तो महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, जून २०२४ पर्यंतचीच माहिती  उपलब्ध झाली आहे.‌ 

नागरीकांच्या करांच्या कोट्यवधी रुपयांतून ही यंत्रणा बसवली गेली असतानाही ही माहिती  अद्ययावत का ठेवली जात नाही हे कोडे उलगडत नाही. एकीकडे महापालिका हवेची गुणवत्ता ढासळल्याने बांधकामांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे शहरांतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता काय आहे ही माहिती रोजच्या रोज अद्ययावत केली जात नाही. महापालिका, वाहतूक पोलीस, नागरीक यांना ही माहिती रोजच्या रोज उपलब्ध झाली तर काही उपाययोजना करणे शक्य होईल. त्यामुळे ‘एयर क्वालिटी इन्डेक्स सेन्सर्स’द्वारा गोळा झालेल्या माहितीचे रिपोर्ट्स रोजच्या रोज पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share this story

Latest