देवदर्शनासाठी येणाऱ्या वाहनाला जेजूरीजवळ भीषण अपघात
पुणे : जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिल्यामुळे गंभीर अपघात घडला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर, ११ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास वाघापूर बेलसर मार्गावर घडला. याप्रकरणी जेजूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे (वय ३५ रा. कुरवंडी ता. आंबेगाव), आशाबाई बाळकृष्ण जरे (वय ५० रा. जरेवाडी ता. खेड) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर मंगल तोत्रे, ज्ञानेश्वर तोत्रे, राहुल तोत्रे, अनुष्का तोत्रे, तानाजी तोत्रे, विलास तोत्रे, बाळू तोत्रे, अश्विनी तोत्रे, मीरा करंडे, ओंकार करंडे, बाबाजी करंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पो चालक शांताराम भिकोबा पवार (वय ५०, रा. वडाची वाडी, वाल्हे ता. पुरंदर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघाताची माहिती सागर दत्तात्रय तोत्रे (रा. कुरंगवाडी ता. आंबेगाव) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर तोत्रे हे चुलत भावाचा टेम्पो घेऊन नातेवाईकांसह जेजुरीला सोमवती यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी निघालेले होते. सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळीकांचन मार्गे त्यांचा टेम्पो बेलसरहून जेजुरीकडे निघाला होता. जेजुरीहून उरुळी कांचनकडे जाणाऱ्या दुसऱ्या एका भरधाव टेम्पोने त्यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली.
समोरासमोर झालेल्या धडकेत तोत्रे यांच्या गाडीचा चालक जितेंद्र तोत्रे आणि त्यांच्याच गाडीमधील आशाबाई जरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, उर्वरीत ११ भाविक जखमी झाले. बेलसर हद्दीतील स्थानिकांनी या अपघाताची माहिती जेजुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जेजुरीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्याचबरोबर आरोपी टेम्पो चालक शांताराम पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.