पुणे रेल्वे स्थानकाचे १०० व्या वर्षात पदार्पण

पुणे: देशभरातील विविध शहरांना पुण्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेले पुणे रेल्वे स्थानक आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असून, सर्व प्रवाशांची अविरतपणे सेवा करत स्थानक सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 27 Jul 2024
  • 12:02 pm

संग्रहित छायाचित्र

पुणे: देशभरातील विविध शहरांना पुण्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेले पुणे रेल्वे स्थानक आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असून, सर्व प्रवाशांची अविरतपणे सेवा करत स्थानक सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे.

स्थानकाचे पहिले डिझाइन १९१५ मध्ये तयार झाले. या वास्तुचे काम पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९२२ मध्ये सुरू झाले. तर, १९२५ मध्ये काम पूर्ण होऊन २७ जुलै १९२५ रोजी तत्कालिन गव्हर्नरने स्थानकाचे उद्‌घाटन केले.१८५३ मध्ये भारतात बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून झाला. सध्या पुणे स्थानकातून २०० हून अधिक रेल्वेगाड्यांद्वारे लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. याशिवाय लोकलदेखील धावतात.

व्हिक्टोरिया टर्मिनसचा विकास करीत असतानाच लंडनमधील ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला. ब्रिटिश लष्कराच्या दृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने मार्च १८५८ मध्ये खंडाळा ते पुणे दरम्यान रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वी १८५६ मध्ये इथे रेल्वेची इमारत उभी राहिली होती. पुणे जंक्शनवरील गाड्यांची संख्या वाढू लागल्याने नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीची गरज भासू लागली. त्यादृष्टीने १९१५ मध्ये या इमारतीचे डिझाईन तयार करण्यात आले. १९२२ मध्ये जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२५ साली ही इमारत उभी झाली. त्यावेळी तिचा खर्च ५ लाख ७९ हजार ६६५ रुपये आला होता.   या नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन हे खास रेल्वे गाडीने पुण्यात आले. २७ जुलै १९२५ रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.  पुणे रेल्वे स्टेशनला हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे. तसेच सुमारे २० वर्षांपूर्वी रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून मान्यता देऊन गौरविले आहे. मात्र, काळाच्या ओघात पुणे रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढत्या रेल्वेगाड्यांमुळे आता हे जंक्शन अपुरे पडत आहे. तरीही रेल्वेने पुणे शहरासाठी दुसरे जंक्शन विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले. हडपसर, खडकी येथे रेल्वेचे जंक्शन विकसित केले जात असले तरी पुणे स्टेशनचा लौकिक आजही कायम आहे. 

पुणे स्थानकातून सुटणारी डेक्कन क्वीन विशेष सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. स्थानकातील सहा प्लॅटफॉर्म अपुरे पडत आहेत. स्थानकाचा विस्तार, स्थानकाच्या आवारातील सुरक्षा, अनाधिकृत प्रवेशद्वारे, पार्किंग व्यवस्था, स्थानकाच्या आवारातील वाहतूक व्यवस्था आदी काही प्रमुख आव्हाने आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest