पुणे: अधिकाऱ्यांना तीर्थ म्हणून पाजले इंद्रायणीचे प्रदूषित पाणी

इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बुधवारी (दि. २६) शिवाजीनगर येथील कार्यालयात वारकरी बांधवांसोबत आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 27 Jun 2024
  • 01:51 pm

अधिकाऱ्यांना तीर्थ म्हणून पाजले इंद्रायणीचे प्रदूषित पाणी

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून वारकऱ्यांच्या मदतीने अनोखे आंदोलन

इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बुधवारी (दि. २६) शिवाजीनगर येथील कार्यालयात वारकरी बांधवांसोबत आंदोलन करण्यात आले.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना इंद्रायणी नदीचे प्रदूषित पाणी तीर्थ म्हणून पाजत हे आंदोलन करण्यात आले.

आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने लाखो वारकरी महाराष्ट्र-कर्नाटकमधून आळंदीत येतात. आळंदीत आलेले भाविक इंद्रायणी नदीचे जल तीर्थ म्हणून पितात. परंतु या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाबद्दल प्रशासनाने पावले उचलली नाही तर प्रदूषित पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ घालायला मागेपुढे बघणार नाही, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणावर तातडीने पावले उचलावी, यासाठी शिवसेना ठाकरे गटाने हे आंदोलन केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात इंद्रायणी नदीचे प्रदूषित पाणी आणून  त्याची प्रतीकात्मक पालखी करून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वारकरी बांधव उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांना निवेदन दिले. त्याआधी अधिकाऱ्यांना इंद्रायणीचे प्रदूषित जल तीर्थ म्हणून पाजले. तसेच शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनीही ते प्राशन केले.

इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणावर मागील अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. याबद्दल अनेक आंदोलने झाली. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली नाही. याबद्दल प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला तरी सत्ताधारी यावर काहीच पावले उचलताना दिसत नाही. तसेच आषाढी वारी आल्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम केले जाते. शिवसेनेने मागील अनेक वर्षांपासून या विषयाबाबत पत्रव्यवहार केला. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला.

यावेळी  शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख संजय मोरे यांनी इंद्रायणी नदीच्या जलप्रदूषणाकडे प्रशासनाने तत्परतेने लक्ष द्यावे अन्यथा प्रशासनाला  प्रदूषित पाण्याने आंघोळ घालायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला. तर गजानन थरकुडे यांनी सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटची आजची परिस्थिती आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी नदीकाठ सुशोभिकरणापेक्षा नदी स्वच्छता, तसेच इंद्रायणी उगमापासून एसटीपी प्लांटची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे नमूद केले.

आंदोलनात आळंदीहून वारकरी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, समीर तुपे, आनंद गोयल, भरत कुंभारकर, किशोर रजपूत, संतोष गोपाळ, अनंत घरत, कल्पनाताई थोरवे, स्वाती ढमाले, उत्तम भुजबळ, राजेंद्र बाबर, अतुल दिघे, राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, जगदीश दिघे, प्रवीण डोंगरे, मकरंद पेठकर, प्रसाद चावरे, नागेश खडके, इम्रान खान, राम थरकुडे, युवराज पारीख, फैजान पटेल, गणेश काकडे, प्रसाद जठार, पुरुषोत्तम विटेकर, सिद्धांत भालेराव, सूर्यकांत पवार, मनोज यादव, नाना मरगळे, राहुल शेडगे, बद्रुद्दीन शेख, हेमंत यादव , परेश चौरे, संजय गवळी, हेमंत धनवे, नितीन दलभंजन, शहेबाज पंजाबी, महिला आघाडीच्या अमृता पठारे, रोहिणी कोल्हाळ, विद्या होडे, ज्योती चांदेरे, सोनाली जुनवणे, अश्विनी मल्हारे, प्रविनी भोर, पूजा उलालकर, अलका भांडरे, शीतल पाठमासे,  इतर शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest