संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आयुक्तपदाचा पदभार शुक्रवारी (दि. २८) योगेश म्हसे यांनी स्वीकारला. पहिल्या दिवशी त्यांनी पीएमआरडीएच्या विविध कामकाजाची माहिती घेतली. शुक्रवारी दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी मावळते आयुक्त राहुल महिवाल उपस्थित होते. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह प्रशासन, महानगर नियोजन, अतिक्रमण विरोधी, जमीन व मालमत्ता त्याचप्रमाणे स्थापत्य अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणमध्येही काम केले आहे. त्यापैकी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांची विशेष भेट घेतली. पीएमआरडीए अंतर्गत विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर प्रलंबित कामे, विशेषतः विकासकामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. गुरुवारी ते पदभार स्वीकारणार अशी चर्चा होती. त्यासाठी प्रत्येक विभागात निरोपही पाठवण्यात आला होता. आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत थांबले होते. नंतर त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारणार असल्याचा निरोप दिला. त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासून त्याची तयारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली होती. अखेर दुपारी म्हसे आले आणि पदभार स्वीकारला.