संग्रहित छायाचित्र
लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अपघात, पाण्यामध्ये तरुणाचा अतिउत्साह आणि व्हीडीओ आणि रिलीज या नादात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे. यंदा अँटी हुल्लडबाजी पथक तैनात केले असून, ते पथक थेट कारवाई करणार आहे.
राजमाची गार्डनमध्येही पर्यटक गर्दी करत असतात, तेथूनही सह्याद्रीच्या पर्वतरांगा व हिरवेगार डोंगर तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे दृश्य नजरेस पडत आहे. पुढे सनसेट पॉईंट व ड्यूक्स पॉईंट या ठिकाणाहून दिसणारे निसर्गसौंदर्य, बोगद्यामधून बाहेर पडणारी रेल्वे गाडी, समोरच दिसणारा पर्वत व डोंगरदऱ्यांमधून निघणारे पांढरेशुभ्र धुके हा सर्व नजारा पाहण्यासाठी पर्यटक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लोणावळा, खंडाळा शहरातील निसर्गसौंदर्य व थंड हवा पर्यटकांना हवीहवीशी वाटते.
पाण्यात अतिउत्साह नको
लोणावळा तसेच पवना परिसरातील नदी, धबधबे या ठिकाणी पाण्यात उतरून तरुणांनी अतिउत्साहीपणा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी पवना धरणात पुण्यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी कासरसाई धरणातही एकाचा मृत्यू झाला होता. लोणावळा, मावळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणच्या धरणामध्ये खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेताना इतरांच्या जिवाला धोका होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
व्हीडीओ रील्सचे प्रमाण वाढले
लोणावळा, मावळ परिसरात धबधबे, धरण आणि विविध पॉईंटवर नागरिक थांबून व्हीडीओ आणि रिल्स बनवत आहेत. मात्र, यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी असे प्रकार करू नये, असे आव्हानदेखील केले आहे. यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार आहे.
असा असेल बंदोबस्त
लोणावळा परिसरातील पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या आहेत. गेल्या वर्षी स्थानिक पोलीस मित्र आणि स्वयंसेवक यांची मदत घेतली होती. या वर्षीही तोच उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याप्रमाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून शंभर कर्मचारी आणि होमगार्ड मागवण्यात आले आहेत. शंभरहून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले असून, त्या अनुषंगाने बैठक आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोणावळा ग्रामपंचायत, आयआरबी आणि रस्ते विकास महामंडळ या सर्वांची एकत्रित बैठक झाली असून, त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही. त्याचप्रमाणे रस्ते विकास महामंडळाशी वाहतुकीला अडथळा येणारे अतिक्रमण काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. रस्त्यावर थांबणारे हातगाडी धारक, विक्रेत्यांनादेखील नोटीस बजावण्यात आल्या आहेत. भुशी डॅम धरण रस्त्यावर 'नो पार्किंग' करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
भुशी धरण परिसरात वाहने उभी करण्यास मनाई
भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे आता येथे रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. जेथे पार्किंगची व्यवस्था केली आहे, तेथेच पर्यटकांनी आपली वाहने उभी करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. खंडाळा राजमाची पॉइंट परिसरातही रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी वाहने उभी करण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत.
नियम मोडणाऱ्या ११२ वाहनांवर कारवाई
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा शहरातून सकाळी ६ ते रात्री दहा या दरम्यान अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र हा नियम धुडकावून वाहन शहरात नेणाऱ्या तब्बल ४५ चालकांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे नियमाचे उल्लंघन करणे, विरुद्ध बाजूने वाहन चालवणे, वाहतुकीला अडथळा होईल असे वाहन उभे करणे अशा एकूण ६७ वाहनांवर कारवाई केली आहे, तर आणखी १५ वाहनांवर खटले दाखल केले आहेत. ठिकठिकाणी अवजड वाहनांना बंदी अशा सूचना लावून देखील वाहनधारक नियम मोडत आहे.