संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याला जणू पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा डोळ्यांमध्ये साठवून ठेवतानाच वारकऱ्यांचे पाय जणू पंढरपूरच्या ओढी लागले आहेत.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla 2024

संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ज्ञानोबा माउली, ज्ञानराज माउली तुकारामच्या गजरात दुमदुमला इंद्रायणीचा तीर, भक्तिरसात अवघी अलंकापुरी न्हाऊन निघाली

पंढरीची वारी । आनंद सोहळा ।।

पुण्य उभे राहो आता । संताच्या या कारणे ।।

पंढरीच्या लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ।।

या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याला जणू पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा डोळ्यांमध्ये साठवून ठेवतानाच वारकऱ्यांचे पाय जणू पंढरपूरच्या ओढी लागले आहेत. अशा या भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (२९ जून) अलंकापुरीतून प्रस्थान झाले. टाळ, मृदंगाच्या गजरात 'ज्ञानोबा माउली ज्ञानराज तुकाराम'च्या जयघोषात लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. Wari 2024

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. सकाळी देऊळवाड्यात सोहळा सुरू झाला. प्रस्थान सोहळादिनी आळंदीत दिवसभर माउली नामाचा गजर सुरू होता. अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. लाखो भाविक आळंदीत माउलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले होते. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वतःच्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायीवारी सोहळा शनिवारी (दि. २९) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केले. देहभान विसरून 'ग्यानबा तुकाराम'चा जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला होता. आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायी वारीत  सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे. शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले. आळंदी भाविकांनी गजबजून निघाली आहे. आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माउलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. प्रस्थान सोहळ्यानंतर आजोळघरात अनेकांनी रांगेतून दर्शन घेतले.

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात अनेक हार, प्रसाद, फुलांची व वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजली होती. मंदिरामधील दर्शनबारीत वारकरी भाविक 'ज्ञानोबा माउलीचा' जयघोष करत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये क्षणभर विसावून हरिनामाचा जप करताना दिसत होते. अनेकांनी महाद्वार बाहेर राहून प्रस्थान सोहळा अनुभवला.  माउली मंदिराच्या मुख्य महाद्वारातून पालखी बाहेर पडल्यानंतर स्थानिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सनई - चौघडे,  ढोल ताश्यांच्या गजरात माउली नामाच्या गजरात पहिला मुक्काम स्थळ आणले.

माउलींची महापूजा...

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पायीवारी प्रस्थानप्रसंगी पवमान अभिषेक, ११ ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माउलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माउलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते.

वारकरी झाले बेभान ...

आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ-मृदंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकारामा’चा जयघोष अंगावर शहारे उमटवला होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते. या प्रसंगी मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आज पुण्यात दुसरा मुक्काम...

आजोळघरात रविवारी (दि. ३०) पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकार यांचा माउलीच्या पालखीला नैवेद्य दाखवला जाईल. सहाच्या दरम्यान शितोळे सरकार अश्व आजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात येईल. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजवलेल्या रथात विराजमान करण्यात येईल. त्यानंतर  वाजत - गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुका शेजारी जाऊन विसावा घेईल. थोरल्या पादुका मंदिरात आरती करण्यात येईल. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.

महाद्वारातून वारकरी, भाविकांना प्रवेश बंद

वाढती गर्दी लक्षात घेऊन शुक्रवारपासून (दि. २८) महाद्वारातून वारकरी तसेच भाविकांना प्रवेश बंद केला होता. प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला टेम्पो, ट्रकमधून वारकरी भाविकांचे आगमन झाले, तर काही वारकरी पायी चालत आळंदीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या आगमनाने इंद्रायणी नदीतीर गजबजून निघाला आहे. इंद्रायणी तीरावर वासुदेवाच्या हरिनामाचा गजर ऐकू येत आहे. तर काही भाविक वारीची आठवण जतन करण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना दिसून येत होते.

तरुणाईचा मोठा उत्साह....

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या दिंड्यांमध्ये तरुण–तरुणींचा मोठा सहभाग होता. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण-तरुणींबरोबरच शहरी भागातील तरुण वर्गाचा सहभाग होता. गळ्यात टाळ घेऊन तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हे तरुण दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

स्वच्छतेची काळजी...

संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान काळात आळंदी शहर स्वच्छ राहावे, म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून वेळच्या वेळी साफसफाईवर भर देण्यात आलेला. जागोजागी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मार्गात कोठेही कचरा होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर फिरत्या स्वच्छतागृहांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन पिंपरी–चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त  ठेवला आहे. शेकडो पोलीस रस्त्यावर थांबून सुरक्षिततेची काळजी घेत आहेत. पालखी सोहळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस, वॉचर यांचीही नेमणूक केलेली आहे. प्रस्थान सोहळा नंतर माउलींची पालखी आळंदीतून आजोळघरी मुक्कामी राहते. त्यामुळे माउलींचे मंदिर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट तसेच संपूर्ण आळंदी शहरातच पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla 2024

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest