पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महापालिका सज्ज

दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शहरात रविवारी (दि. ३०) आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.

संग्रहित छायाचित्र

दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शहरात रविवारी (दि. ३०) आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आळंदी रस्त्यावरील सयाजीराव कुसमाडे संकुल (करसंकलन कार्यालय), कळस क्षेत्रीय कार्यालय, आळंदी रस्ता येथे दुपारी १२.३० वाजता आगमन झाल्यानंतर प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पालखींचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुंबई पुणे रस्त्यावरील बोपोडी सिग्नल चौक येथे दुपारी १.३० वाजता आगमन झाल्यानंतर प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पालखीचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. दुपारी चार वाजता मुंबई पुणे रस्त्यावरील नाबार्ड बँकेसमोर पाटील इस्टेट वसाहतीशेजारी येथे दोन्हीही पालख्यांचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. तसेच मंगळवारी (२ जुलै) सकाळी ९.०० वाजता हडपसर गाडीतळाजवळ, हडपसर येथून दोन्हीही पालख्यांचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थानावेळी आयुक्त डॉ. भोसले पुणे मनपाचे वतीने निरोप देणार आहेत.

महापालिका देणार या सुविधा

आरोग्य विभाग : पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा पुरविली जाणार आहे. रविवारी मनपाचे वैद्यकीय पथक (जुना फिरता दवाखाना) वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्स, नर्सिंग ऑर्डर्ली व प्रथमोपचारासह पुणे-मुंबई रस्त्यावरील फुले नगर (विश्रांतवाडी), पुणे-मुंबई रस्त्यावरील पाटील इस्टेट वाकडेवाडी, साखळपीर तालीम येथे उपस्थित राहील.  पालखीसोबत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ पोलीस चौकीसमोर, रामोशी गेटपर्यंत राहील. व दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी/ भाविकांसाठी मोफत उपचार करण्यात येतील.

पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ व मामासाहेब बडदे दवाखाना, नाना पेठ येथे प्राथमिक उपचारासाठी २४ तास दवाखाने कार्यरत ठेवण्यात येऊन वारकऱ्यांना मोफत उपचार करण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील १० टक्के बेड्स (खाटा) आरक्षित ठेवणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दवाखाने, प्रसूतिगृह/रुग्णालये येथे मोफत तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पुणे मनपाचे वैद्यकीय पथक पुणे ते पंढरपूर मुक्कामापर्यंत पाठविण्यात येणार आहे.  कीटकनाशक विभागामार्फत पालखी मार्ग, सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पशुवैद्यकीय विभागामार्फत पुणे मनपा हद्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग : 

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडझूड, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता विषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक कार्यरत आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण अंदाजे १६९० पोर्टेबल व फिरते शौचालयाची सोय करण्यात आलेली असून दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महिला वारकऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार मनपा शाळेत व खासगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय व महिलांसाठी न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर व वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २,६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७,५०० किलो कार्बोलिक पावडर व ११,२५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर इत्यादी पुरविण्यात येणार आहे. महिला वारकऱ्यांसाठी ५०,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.  

घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण विभाग, गलिच्छ वस्ती निर्मूलन विभाग, विद्युत विभाग, वाहन विभाग, भवन रचना, ड्रेनेज, पथ विभाग, आरोग्य, अतिक्रमण, उद्यान, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी जय्यत तयारी केलेली आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest