कुलसचिव पदभरती पुन्हा लांबणीवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता आणि प्रभारी कुलसचिव पदभरतीशी निगडीत अनेक प्रश्न काही अधिसभा सदस्यांकडून येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेच्या उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अधिष्ठाता भरतीची जाहिरात पुढील आठवड्यात? खुला, ओबीसी, एससी आणि एनटी संवर्गातील उमेदवारांमधून निवड होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता आणि प्रभारी कुलसचिव पदभरतीशी निगडीत अनेक प्रश्न काही अधिसभा सदस्यांकडून येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेच्या उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.परंतु, विद्यापीठाकडून पुढील आठवड्यात पूर्णवेळ रिक्त असलेल्या चार अधिष्ठातापदाच्या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, कुलसचिव पदभरती आणखी काही दिवस लांबणार आहे. त्यामुळे पूर्णवेळ कुलसचिव कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर पूर्णवेळ अधिष्ठाता यांचाही कार्यकाळ संपला. मात्र, त्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. कारभारी काळे यांनी प्रभारी अधिष्ठाता पदावर चार व्यक्तींची नियुक्ती केली. पुढे डॉ. सुरेश गोसावी यांनी पूर्णवेळ कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारली. गोसावी यांच्या कार्यकाळात अधिष्ठाता भरतीची जाहिरात देण्यात आली होती. तसेच पात्र उमेदवारांकडून अर्जही स्वीकारण्यात आले. परंतु, या भरतीसाठी राज्य शासनाकडून आरक्षणाचा नियम लागू करण्यात आला. परिणामी संबंधित जाहिरात रद्द करण्यात आली.आता खुला संवर्ग, ओबीसी संवर्ग, एससी संवर्ग आणि एनटी संवर्गातील उमेदवारांमधून अधिष्ठाता पदाची निवड केली जाणार आहे.

राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आरक्षणानुसार आता विद्यापीठ प्रशासनातर्फे नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. विधानसभा निवडणूकीची आचार संहिता लागू असल्याने विद्यापीठाला अधिष्ठातापदाची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही. मात्र, आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुढील आठवड्यात अधिष्ठाता भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे विद्यापीठाचे नियोजन असल्याचे विद्यापीठाच्या वारिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तसेच येत्या ३० नोव्हेंबर पूर्वी जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास अधिसभा सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी वर्ष उजाडणार

 विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रभारी कुलसचिवपदी डॉ. विजय खरे यांची आणि त्यानंतर डॉ. ज्योती भाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी पूर्णवेळ कुलसचिवपदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादामुळे सर्व प्रकरण राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. राज्यपाल कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतरच कुलसचिव निवडीची पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव आणि पूर्णवेळ अधिष्ठाता मिळण्यास नवीन वर्ष उजाडणार आहे, असेही विद्यापीठातील वारिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest