Pune News: मतदान होताच सर्वसामान्यांचा खिसा कापला

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. प्रचारादरम्यान मोठमोठ्या आश्वासनांच्या वाफा सोडण्यात आल्या. महागाई हटवण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तत्काळ आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत वाढ होत असल्याचे कारण देत सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर प्रतिकिलो दोन रुपये वाढ करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Sat, 23 Nov 2024
  • 12:31 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याचे कारण देत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपये वाढ, पुणेकर नाराज

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. प्रचारादरम्यान मोठमोठ्या आश्वासनांच्या वाफा सोडण्यात आल्या. महागाई हटवण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तत्काळ आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत वाढ होत असल्याचे कारण देत सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर   प्रतिकिलो दोन रुपये वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने सीएनजीला पसंती देणाऱ्या पुणेकरांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

सीएनजी दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर पोहोचला आहे. पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढीचा दणका बसला आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २७ टक्के बचत होत असून रिक्षाचालकांची २९ टक्के बचत होत आहे, असे कंपनीने सप्टेंबरमधील दरवाढीवेळी म्हटले होते. यावर्षी जुलै महिन्यातही सीएनजीचे दर वाढले होते.

सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. पुण्यात जुलैमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर त्यावेळी प्रतिकिलो ८५ रुपयांवर पोहोचला होता. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनाचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.

पर्यावरणपूरक वाहने वापरण्याला सरकारकडून आवाहन केले जात आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी योजना आखली जात आहे. इंधन दरवाढीला त्रासून अनेकांकडून सीएनजी वाहनांना पसंती दिली जात आहे. त्यासोबत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला पसंती दिली जात आहे. असे असले तरी इलेक्ट्रिक वाहनांबाबत गैरविश्वास, चार्जिंग असुविधा त्यामुळे नागरिकांकडून सीएनजी वाहनांना पसंती दिली जात आहे. सार्वजनिक वाहतुकीत रिक्षादेखील सीएनजीच्या आल्या आहेत. त्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच एका कंपनीने सीएनजीवर असलेली दुचाकी बाजारात दाखल केली आहे. परंतु पेट्रोल-डिझेलच्या दराच्या तोडीस तोड सीएनजीचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. दोन पैसे वाचविण्यासाठी सीएनजी गाड्या घेवून इंधन दराएवढाच खर्च करावा लागत असेल तर पेट्रोल-डिझेलच्याच वाहनांना का पसंती देऊन  नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहे.

बाजारात अनेक मालवाहतूक करणारी वाहने सीएनजीवरील आहेत. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने आता भाड्याच्या दरात वाढ होण्याती शक्यता आहे. याचा फटका हा सर्वसामान्यांनाच बसणार आहे. निवडणुकीत महागाईवर नियंत्रण आणण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र आता वाढलेल्या दरात एक रुपया कमी करुन राजकारणी आपली पाठ थोपटून घेतील, असे नागरिकांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.  

एका महिन्यात दुसऱ्यांदा स्वस्त गॅसचा पुरवठा कमी झाल्यानंतर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड या सिटी गॅस कंपन्यांकडून सीएनजीच्या किमती वाढविण्याचा विचार केला जात होता. या घोषणेचा थेट परिणाम महानगर गॅस लिमिटेडच्या शेअर्सवरही दिसून आला. एमजीएलच्या शेअर्समध्ये सुमारे ३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. एमजीएलचे शेअर्स सध्शया १,१६० रुपयांच्या घरात आहेत. घरगुती गॅसवाटप कमी करण्याच्या सरकारच्या नुकत्याच निर्णयानंतर ही वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

इराण आणि अमेरिका या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. इराणमधून समुद्रमार्गे येणाऱ्या एलएनजी जहाजांच्या इन्शुरन्सच्या किंमती वाढविल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार किंमतवाढ झाली आहे. त्याचा परिणाम आपल्या देशात झाला असून त्यामुळे सीएनएजीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. येत्या काहीकाळात सीएनजीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. - अली दारूवाला, अध्यक्ष, ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन

सातत्याने महागाई वाढत असल्याने खर्च कसा करावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पेट्रोलची रिक्षा परवडत नसल्याने सीएनजीची रिक्षा घेतली. पेट्रोलप्रमाणेच सीएनजीचे दरवाढणार असतील तर त्यातुलनेत प्रवासी भाडे वाढविले जाणार आहे का? मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर भाडेवाढ करता येऊ शकते. पण रिक्षाचालकांना आरटीओच्या नियमानुसार भाडे आकारावे लागते. यामुळे आम्हा रिक्षाचालकांनाच या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. -  महेंद्र पवार, रिक्षाचालक

सरकारच्या निर्णयानंतर भाववाढ

सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रशासकीय किंमत यंत्रणा गॅस वाटप २० टक्क्यांनी कमी केले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आली आहे. या पावलामुळे एमजीएल आणि आयजीएलसारख्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भविष्यात सीएनजीची किंमत आणखी वाढणार

सध्या सीएनजीच्या किमतीत दोन रुपयांची वाढ सुमारे २.६ टक्के इतकी आहे. तज्ञांच्या मते, एपीएम गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी सीएनजीच्या किमती ८-१० टक्के वाढवाव्या लागतील. लवकरच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडदेखील किमती वाढवण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार

 सार्वजनिक वाहतूकीत ऑटोरिक्षा आणि कार सीएनजीवर आहेत. सीएनजी वाढल्याने सीएनजी वाहनचालकांच्या खिशाला थेट फटका बसणार असून या भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संचालन खर्चात वाढ झाल्याने भाडे वाढण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांसमोर ही वाढ आणखी एक आव्हान म्हणून समोर आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest