संग्रहित छायाचित्र
पुणे: शिवाजीनगर परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेत यशस्वी ॲकॅडमी फॉर स्कील्सने उभारलेले हॉटेल बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतनने (Government Polytechnic) केलेल्या करारात हॉटेल चालविण्याचा उल्लेख नव्हता, असे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
सरकारी मालकीच्या इमारतीतील जागा व्यावसायिक नफ्यासाठी खासगी हॉटेलला कशी दिली, याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रारी करून आक्षेप घेतला होता. याबाबतच्या कराराची प्रतही मागितली होती. मात्र, करारामध्ये हॉटेलचा उल्लेख नसल्याचे आढळून आले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे असे लेखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, यशस्वी अकादमी फॉर स्किल्ससोबत झालेल्या सामंजस्य करारात या जागेवर हॉटेल सुरू करण्याचा उल्लेख नाही. हॉटेलला कोणतीही मान्यता दिली नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला तंत्रशिक्षण मंडळ जबाबदार राहणार नाही. १४ मार्च २०२३ रोजी यशस्वी अकादमी फॉर स्किल्स विथ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिस्टन्स लर्निंगसोबत सामंजस्य करार झाला होता. आमच्याकडे बेकायदेशीर हॉटेलबाबत तक्रार आली आहे. सामंजस्य कराराचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की या जागेत हॉटेल उभारण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे याबाबत योग्य कारवाई करण्याचे आदेश शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना देण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास म्हणाले की, ‘ सीविक मिरर’ ने हा गैरव्यहार उघड केला होता. आता तंत्रशिक्षण मंडळाने अधिकृतपणे हे हॉटेल बेकायदेशीर असल्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते उल्हास अग्निहोत्री म्हणाले की, सरकारी मालमत्ता व्यावसायिक कामांना कशी दिली जाते यावर आमचा आक्षेप आहे. माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती घेतली होती. तंत्रशिक्षण मंडळाने सामंजस्य कराराचा अभ्यास केल्यावर चूक मान्य केली आहे. ‘ सीविक मिरर’ने यातील सत्य समोर आणले. एमएसबीटीईने एमओयूची उलटतपासणी केल्यानंतर त्यांची चूक मान्य केली. सत्य उघड केल्याबद्दल मी ‘ सीविक मिरर’ चे आभार मानतो."
तंत्रशिक्षण विभागाचे पुणे विभागीय संचालक दत्तात्रय जाधव आणि शासकीय पॉलिटेक्निक पुणेचे प्राचार्य विठ्ठल बांदल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध झाले नाहीत.
पॉलिटेक्निक प्राचार्याची बदली
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल यांच्या बदलीबाबत शासनाने निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यांची शासकीय पॉलिटेक्निक अवसरी येथे बदली झाली आहे. डॉ. राजेंद्र पाटील हे शासकीय पॉलिटेक्निक पुणेचे नूतन प्राचार्य असतील. ते शासकीय पॉलिटेक्निक कराडचे प्राचार्य होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.