Pune News: वेळेवर पाणी सोडणे जमेना, अन् पाण्याच्या अपव्ययाची धाडली नोटीस

हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून तुकाई दर्शन, फुरसुंगी भागात पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल नागरिकांना नोटिसा देण्यात आल्याचे समोर आले आहे. या नोटिसांवर हडपसर भागातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर संताप व्यक्त केला आहे.

संग्रहित छायाचित्र

तुकाई दर्शन, फुरसुंगी भागातील घटना, कोणतीही चौकशी न केल्यामुळे नागरिकांचा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर संताप

हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून तुकाई दर्शन, फुरसुंगी भागात पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल नागरिकांना नोटिसा देण्यात आल्याचे समोर आले आहे. या नोटिसांवर हडपसर भागातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेने नोटिसा देताना कोणतीही चौकशी केली नाही तसेच कारणेदेखील समजून घेतली नाहीत. या भागात पाणी सोडण्याची साधी एक वेळ या पाणीपुरवठा विभागाला ठरवता येत नाही. रात्री-अपरात्री पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना वेळ साधणे कठीण जाते. त्यामुळे पालिकेच्याच चुकीमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावाचा काही भाग यामध्ये येतो. महानगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी आकारण्यास सुरुवात केली आहे. परंतु गेल्या सात वर्षात  पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणे अद्याप महापालिकेला शक्य झालेले नाही. आमच्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु पाणीपुरवठ्याचे कोणतेही वेळापत्रक ठरविण्यात आलेले नाही. मनाला वाटेल त्यावेळी पाणी सोडले जाते. नागरिकांना कामधंदे सोडून २४ तास पाण्याची वाट पाहात राहावी, अशी अपेक्षा महापालिकेची आहे काय? या भागात गावातील  स्थानिक नागरिक आणि महापालिकेचा कायम सेवक पाणी सोडण्याचे काम करतो. त्यामुळे तो मी गावकरी असल्याचे सांगून नागरिकांवर रुबाब करत असतो. त्यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही, की दबाव नाही. त्यामुळे मनमानी व हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात असून नागरिकांना पाणी मिळत नाही. याबाबत वेळोवेळी पुणे महापालिकेच्या १८००१०३०२२२ व ९६८९९००००२ या क्रमांकावर तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र महापालिकेकडून कोणतीही देखील व कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. असा आरोप नागरिकांना ‘सीविक मिरर’शी बोलताना केला.

पाणीपुरवठा अधिकारी जबाबदारी घेत नाहीत

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा पाणी सोडणाऱ्या व्यक्तीची तक्रार केली. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. पाणी पुरवठ्याचे नियोजन कधी केले जाणार आहे, असे विचारले असता, कधीही योग्य उत्तर दिले जात नाही. ‘‘वरून पाणी आलेले नाही, त्यामुळे टाकीमध्ये पाणी नाही. ज्यावेळी त्यावेळी सोडले जाईल, असे सांगून जबाबदारी झटकली जात आहे,’’ असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी कधीही आल्यानंतर ते एका ठराविक वेळेला पाणी सोडले तर नागरिकांना पाणी मिळण्यास अडचण येणार नाही. असे नागरिकांचे म्हणणे असून तत्काळ प्रत्येक भागाचे वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाने जाहीर करावे, अशी मागणीही केली आहे.

या आहेत नागरिकांच्या तक्रारी...

अनेक वेळा पहाटे ४ वाजता पाणी सोडले जाते

पाणी सोडणाऱ्यांकडून पाणी सोडण्यास टाळाटाळ होते

पाणी सोडणाऱ्यांकडे चौकशी  केली असता, फोन न उचलणे, उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.

अनेकदा पाणी सोडून बंद करण्यास विसरून जाणे, नियोजित वेळेपेक्षा कमी वेळ पाणी सोडणे, पाणी सोडले तर कमी दाबाने पाणी सोडले जाते

असमान पाणीपुरवठा केला जातो

पाणी सोडण्यास पैशाची मागणी करणे, पाणी कधी येणार याची चौकशी करण्यास फोन केला तर फोन न उचलणे.

तुकाई दर्शन आणि इतर भागात नागरिकांना वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जातो. काही नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. रस्त्यावर पाणी सोडणे, घरावरील टाक्यांमधून पाणी वाहत जाणे, असे प्रकार घडत आहेत. पाण्याचे संकट असताना असे पाणी वाया जाऊ देणे योग्य नाही. त्यामुळे वॉलमन, कनिष्ठ अभियंता यांच्याकडून कारवाई केली जात आहे. सातत्याने नागरिकांना आवाहन करूनदेखील पाणी वाया घालवत असल्याने केलेली कारवाई योग्य आहे. नागरिकांना पाणी जपून वापरावे, पाणी वाया घालवल्यास कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.

   - इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग

Share this story

Latest