फायर ऑडिट करा, अन्यथा पाणी बंद
पुणे: आगीच्या घटना वारंवार घडत असूनही व्यापारी मिळकतींकडून अग्निसुरक्षेसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यासाठीचे फायर ऑडिट करण्यासही दिरंगाई होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने व्यापारी संकुले, मॉल्स, उंच इमारती, खासगी शाळा आणि कार्यालये यांना कडक इशारा दिला आहे. ३१ मार्चपूर्वी फायर सेफ्टी ऑडिट करून अहवाल सादर केला नाही तर पाणी बंद करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. (Latest News Pune)
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांत आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही.मात्र, अनेक ठिकाणी आग रोखण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे आढळून आले. त्यामुळे फायर ऑडिट न करणाऱ्या मिळकतींचे पाणी महाराष्ट्र अग्निरोधक आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियम, २००६ च्या निर्देशांनुसार तोडण्यत येणार आहे.
व्यापारी आस्थापनांनी वर्षातून दोन वेळा नियुक्त एजन्सीकडून फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. त्याचा अहवाल जानेवारी आणि जुलैमध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो. कायद्याच्या कलम ८(२) आणि नियम ११(१) मध्ये नमूद केल्यानुसार फायर ऑडिट केल्याचे आवश्यक प्रमाणपत्र (फॉर्म-बी) सादर केले नाही, तर भविष्यात होणाऱ्या अपघाताची जबाबदारी संबंधित व्यापारी आस्थापनांवर येते. अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून असुरक्षित समजल्या जाणाऱ्या इमारतींचे पाणी आणि वीज पुरवठा तोडण्याची कायद्यात तरतूद आहे.
शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले, मॉल्स, पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या व्यावसायिक कार्यालयांच्या इमारतीच्या मालकांची ही जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या आस्थापनेत अग्निसुरक्षेचे उपाय करणे आवश्यक आहे. त्याचसोबत त्याची वारंवार देखभाल आणि दुरुस्ती करून चालू स्थितीत राहतील हे पाहणेही गरजेचे आहे.
झोपडपट्ट्यांचेही फायर ऑडिट करण्याची मागणी
सहकारनगर फोरमने मोहल्ला समितीत चर्चेनंतर प्रभाग कार्यालयाला पत्र सादर केले होते. त्यामध्ये झोपडपट्ट्यांच्या परिसरातही फायर ऑडिट करण्याची विनंती पुणे महापालिकेला केली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार फायर ऑडिट करण्यापेक्षा झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये जागरूकता निर्माण केल्यास आगीच्या घटना टाळता येऊ शकतात. झोपडपट्ट्यांमधील अंतर्गत गल्ल्यां अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचणे अवघड होते. अग्निशमन दलाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ते रुंद करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आगीपासून बचाव करण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये काँक्रिटची घरे बांधण्याची सूचना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.