पुणे : कंत्राटी कामगारांचा पालिका उतरवणार अपघाती विमा

महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेत काम करणाऱ्या जवळपास आठ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा सुमारे १५ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे.

PMC Pune

पुणे : कंत्राटी कामगारांचा पालिका उतरवणार अपघाती विमा

आठ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा, २६५ रुपयांत मिळणार १५ लाखांचे सुरक्षा कवच

महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेत काम करणाऱ्या जवळपास आठ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा सुमारे १५ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अवघे २६५  रुपये  घेतले जाणार आहेत. ही माहिती महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (PMC Pune)

पालिका कायम कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना चालवली जाते. पूर्वी कर्मचाऱ्यांकडून १३६ रुपये घेऊन १० लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र, मागील वर्षीपासून रक्कम वाढवली आहे. वर्ग एक साठी २५ लाख, वर्ग दोनसाठी २० लाख, वर्ग तीन व चारसाठी १५ लाखांचा विमा उतरवला जात आहे. मात्र, ही योजना कंत्राटी कामगारांसाठी नव्हती. याबाबत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या नियोजनाखाली पालिकेने कंत्राटी कामगारांसाठीही ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नितीन केंजळे यांनी सांगितले की, कंत्राटी कामगारांचा विमा उतरवण्यासाठी कंपनीने तयारी दाखवली. त्यानुसार महापालिकेतील ठेकेदारही यासाठी तयार झाले आहेत. त्यानुसार विमा उतरवण्यास सुरुवात झाली आहे. ठेकेदारांच्या मार्फत विमा उतरवण्यात येत आहे.

 पालिकेत जवळपास ८ हजाराहून अधिक कंत्राटी कमर्चारी आहेत. हे सगळे वर्ग चार मधील कर्मचारी आहेत. या लोकांना जोखमीची कामे करावी लागतात. यात काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूदेखील होतो. परिणामी या लोकांचे कुटुंब उघड्यावर पडते. असे होऊ नये यासाठी १५ लाखाचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे केंजळे यांनी सांगितले.  केंजळे यांनी पुढे सांगितले की, अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास त्या त्या प्रमाणात ही रक्कम मिळेल. त्यासाठी कर्मचाऱ्यांना फक्त २६५ रुपये ५०  पैसे द्यावे लागणार आहेत. हे काम ठेकेदारामार्फतच केले जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरवण्याबाबत ठेकेदारांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ठेकेदारांनी या कामाला सुरुवात केली आहे. कामगारांना याचा चांगला लाभ होऊ शकतो. ठेकेदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन याचा लाभ घ्यावा.

– नितीन केंजळे,मुख्य कामगार अधिकारी, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest