पुणे महापालिकेची रामवाडी आरोग्य कोठी अस्वच्छतेच्या विळख्यात

दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पावसामुळे रामवाडी आरोग्य कोठीजवळ साचलेले पाणी अद्यापही तसेच असल्याने ही कोठीच अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आरोग्य कोठीतील महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पुणे महापालिकेची रामवाडी आरोग्य कोठी अस्वच्छतेच्या विळख्यात

दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पावसामुळे रामवाडी (Ramwadi) आरोग्य कोठीजवळ साचलेले पाणी अद्यापही तसेच असल्याने ही कोठीच अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आरोग्य कोठीतील महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला शहरात पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या होत्या. मात्र, त्या कितपत गंभीरपणे करण्यात आला, हा प्रश्नच आहे. कारण दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी काही भागात अद्यापही साचल्याचे दिसून येत आहे. रामवाडीमधील पुणे महापालिकेची रामवाडी आरोग्य कोठीच यामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. पावसाचे पाणी, सांडपाणी आणि शेजारील रामवाडी पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी भरण्यासाठी आलेल्या टॅंकरमधील सोडलेले शिल्लक पाणी हे रामवाडी आरोग्य कोठीच्या आजूबाजूला साठलेले आहे.

पुणे महापालिकेचे आरोग्य विभागातील (PMC Health Department) अधिकारी-कर्मचारी हे प्रभाग स्वच्छ व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु दररोज प्रभाग स्वच्छ राखणारे अधिकारी-कर्मचारी यांचीच रामवाडी आरोग्य कोठीच साठलेल्या पाण्यामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका आपली आरोग्य कोठी स्वच्छ ठेवू शकत नसेल तर इतर परिसर कसा स्वच्छ ठेवला जाणार, असा संतापजनक प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

डेंगीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका

महापालिकेत गेल्या तीन ते साडे तीन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रभागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, याची साधी जाणीव आरोग्य कोठीतील कर्मचाऱ्यांना नाही का? आरोग्य कोठीच्या परिसरात पावसाचे पाणी तसेच घाण झाल्याने याची तक्रार करण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक होते. तक्रारीआधीच या कोठीमध्ये काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करून स्वच्छ करून घेणे अपेक्षित होते. मात्र पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. पाणी साचल्याने डेंगीची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन साचलेले पाणी काढून घ्यावे, तसेच या परिसरात स्वच्छता राखावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केली.  

नगररोड (वडगावशेरी) क्षेत्रीय कार्यालयाचे  साहाय्यक आयुक्तांकडे ‘‘रामवाडी कोठीच्या परिसरातील स्वच्छतेबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाला सूचना द्याव्या. महापालिकेची रामवाडी मधील रामवाडी आरोग्य कोठीच्या आजूबाजूला साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यास व पुढील वेळेस कोठी येथे पाणी साठणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या,’’ अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र दोन दिवस झाले तरी याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.  

 - प्रमोद देवकर (पाटील), सामाजिक कार्यकर्ते

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest