पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरातच झिकाच्या उत्पत्तीची ठिकाणे, पालिकेकडून नोटीस

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली. त्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे व्हेक्टर-बोर्न रोगांचा प्रसार होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 11:25 am
Pune, Pune News, Deenanath Mangeshkar Hospital, Zika Virus, Zika Disease, Zika in Pune

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरातच डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे, पालिकेकडून नोटीस

एरंडवणा परिसरातील सोसायट्यांनादेखील बजावली नोटीस, आरोग्य विभाग करणार दंड वसूल

नोझिया सय्यद

पुण्यात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून एरंडवणे, डहाणूकर कॉलनी येथील हॉटस्पॉट महापालिकेने शोधून काढले आहेत. झिका व्हायरसची लागण झालेल्या एरंडवणा भागातील पहिल्या रुग्णाची माहिती देणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळून आल्याने बुधवारी (दि. ३) महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रुग्णालयाला नोटीस बजावली.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली. त्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे व्हेक्टर-बोर्न रोगांचा प्रसार होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘सीविक मिरर’ला सांगितले की, 

‘‘आम्ही तत्काळ कारवाई करत केवळ नोटीस देऊन न थांबता, रुग्णालयाला  त्यांच्या  परिसरात आढळलेल्या डासोत्पत्तीच्या ठिकाणांबाबत सतर्क केले असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पालिकेला सर्वप्रथम झिका व्हायरसच्या रुग्णांची माहिती दिली होती. अन्य रुग्णालयांप्रमाणे त्यांनी माहिती दडविली नाही. आतापर्यंत पालिकेने नोंदवलेल्या बहुतांश लागण झालेल्या रुग्णांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यामुळे आम्हाला याविषयी शंका आली.  आम्ही तपासणीसाठी हॉटस्पॉट्स निश्चित केले. तसेच, या भागातील एरंडवणे, डहाणूकर कॉलनी आणि प्रत्यक्ष रुग्णालयालादेखील भेट दिली. त्यावेळी केवळ रुग्णालयामध्येच नाही तर लागण झालेले रुग्ण राहात असलेल्या सोसायट्यांमध्येही डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली. त्यामुळे आम्ही तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रुग्णालय आणि सोसायट्यांना त्यांच्या परिसरात आढळलेल्या डासोत्पत्तीच्या ठिकाणांबाबत नोटीस बजावली आहे. संबंधितांकडून दंडदेखील वसूल केला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.’’

‘‘डासोत्पत्तीची ठिकाणे शोधण्यासाठी तसेच तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डासोत्पत्तीची ठिकाणे आढळून आली आहेत. याविषयी बुधवारी बैठक घेऊन उपाययोजना करण्याविषयी चर्चा करण्यात आली. या आजाराचा पहिला रुग्ण आढळताच आरोग्य विभागाने केवळ उपचारावर भर न देता डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जेणेकरून या विषाणूचा प्रसार रोखता येईल. तसेच, अशा डासोत्पत्तीच्या आणखी ठिकाणांचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्वेक्षण करत आहोत. त्यामुळे शहरातील ‘व्हेक्टर-बोर्न’ आजाराचा फैलाव रोखता येईल. नागरिकांनीदेखील खबरदारी बाळगण्याच्या सूचना डॉ. बळीवंत यांनी केल्या आहेत. दरम्यान, केवळ महापालिकेवर अवलंबून न राहता नागरिकांनी देखील सतर्क राहणे आवश्यक आहे,’’ असे महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना सांगितले.

‘दीनानाथ’कडून माहिती देण्यास टाळाटाळ

यासंदर्भात ‘सीविक मिरर’ने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद राजहंस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘मला याबाबत काहीही माहिती नाही.’’ तसेच, रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बैठकीत असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. रुग्णालयाच्या एका कर्मचार्‍यानेदेखील ‘‘केळकर बैठकीत व्यस्त असल्यामुळे ते उत्तर देऊ शकले नाहीत,’’ असे स्पष्ट केले .

पुण्यातील झिका रुग्णांची ओळख पटवत त्याची महापालिका, आरोग्य विभाग, एनआयव्ही आदी आरोग्य यंत्रणांना वेळेत माहिती देणारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील पहिले रुग्णालय होते. त्याच रुग्णालयात डासांच्या वाढीची ठिकाणे आढळून येणे म्हणजे आश्चर्य आहे. रुग्णालय प्रशासन याला जबाबदार आहे. याविषयी ते उपाययोजना करतील, असे वैद्यकीय क्षेत्रातील एका सूत्राने सांगितले.

शहरात आतापर्यंत आढळले झिकाचे सात रुग्ण

महापालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, ‘‘आतापर्यंत पुण्यात सात झिका रुग्ण आढळले आहेत. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या भागात भेट देऊन झिकाची लागण झालेल्या संशयित १२ गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने एनआयव्हीला पाठवण्यात आले आहेत. यापैकी पाच जण डहाणूकर कॉलनीमधील आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका गर्भवती महिलेची तब्येत आता पूर्णपणे बरी आहे.’’ नागरिकांना त्यांच्या सोसायट्या आणि परिसराची तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. जर डासांच्या वाढीची ठिकाणे सापडल्यास आवश्यक औषध फवारणी करण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या आहेत, असे डॉ. दिघे यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest