पुणे : व्हीएसआयचा जागेवर ताबामारीचा प्रयत्न

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) आपल्या मालकीच्या जागेवर ताबामारी करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार हवेली तालुक्यातील नायगाव येथील भिल्ल समाजाच्या नागरिकांनी केली आहे.

VSI

पुणे : व्हीएसआयचा जागेवर ताबामारीचा प्रयत्न

नायगाव येथील भिल्ल समाजाचा आरोप, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटविरुद्ध न्यायालयात याचिका

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (Vasantdada Sugar Institute) (व्हीएसआय) आपल्या मालकीच्या जागेवर ताबामारी करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार हवेली तालुक्यातील नायगाव येथील भिल्ल समाजाच्या नागरिकांनी केली आहे.

सुमारे चाळीस गुंठे जागेवर असलेल्या भिल्ल समाजाच्या घरांसह देवस्थान बुलडोझर लावून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत पुण्यातील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट राज्यभरातील साखर कारखानदारांची संघटना आहे. या संस्थेकडून ऊस शेतीबाबत संशोधन केले जाते. शरद पवार यांच्यासह राज्यातील बडे नेते या संस्थेवर पदाधिकारी आहे. व्हीएसआयला १९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून  १०७.८६ हेक्‍टर एवढी जमीन मिळाली आहे. या जमिनीशेजारीच ४० गुंठे क्षेत्रावर भिल्ल समाजाची वस्ती आहे. त्या ठिकाणी त्यांचे देवस्थानही आहे.  १२ ऑक्टोबर २०२३ रोजी संस्थेमधील काही अधिकाऱ्यांनी स्थानिक भिल्ल लोकांना ‘‘लवकरात लवकर जागा खाली करा. नाही तर तुमची घरे आणि झोपड्या बुलडोझरने उद्ध्वस्त केल्या जाईल,’’ अशी धमकी दिली. त्याविरुद्ध भिल्ल समाजाने कायदेशीर नोटीसही पाठविली. मात्र, तरीही पुन्हा  १२ जून २०२४ रोजी परत त्यांना धमकी देण्यात आली. याबाबत भिल्ल समाजाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली आहे.

भिल्ल समाजाने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, या जागेवर ते गेल्या अनेक दशकांपासून राहात आहेत. नायगाव ग्रामपंचायतीने ते या मिळकतीमध्ये गेली ५० ते ६० वर्षे राहात असल्याबाबत तसेच ते हिंदू भिल्ल समाजाचे असल्याचा ठरावही ग्रामसभेत केला आहे.  ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखल, मतदान कार्ड, गॅस कनेक्शन, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीचे प्रमाणपत्र देखील आहे. त्याबाबतचे लेखी पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी काबाडकष्ट करून त्याठिकाणी घरे बांधली आहेत.

या ४० गुंठे मिळकतीवर व्हीएसआयचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार व ताबा कधीही नव्हता. भिल्ल समाजाचीच वहिवाट आणि ताबा आहे. १९७७ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार व्हीएसआय जागेवर ताबा असल्याचा दावा करत असली तरी त्यामध्ये या जागेचा उल्लेख नाही. याच आदेशानुसार जर जागेचा समावेश असता तरी ती दोन वर्षांच्या आत वापरात आणण्याची अट होती. त्यामुळे आदेशाचा गैरफायदा घेऊन व्हीएसआयला ही जागा बळकाविता येणार नाही, असेही भिल्ल समाजाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. तक्रारदाराच्या बाजूने  ॲड. संग्राम कोल्हटकर, ॲड. माधुरी पाटोळे, ॲड. शिवराज जोशी आणि ॲड. कपिल देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे.

आमच्या जागेवर अतिक्रमण : व्हीएसआय

दरम्यान ही जागा आमचीच असून या जागेवर अतिक्रमण केल्याचा दावा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने केला आहे. भिल्ल समाजाने केलेल्या आरोपांचा इन्कार करताना व्हीएसआयने म्हटले आहे की, व्हीएसआयच्या लगत सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून काही लोकांनी कच्च्या बांधकामातील घरे बांधलेली आहेत आणि ते तेथे वास्तव्य करीत आहेत. सरकारी गायरान जमीन समजून सुभाष बबन गायकवाड, रमा सखाराम पवार आणि कुटुंबीय यांचा काहीही संबंध नसतांना ते संस्थेच्या जागेत बेकायदेशीररित्या अतिक्रमण करत आहेत. हे व्हीएसआयच्या पदाधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तोंडी सूचना देऊन एकूण जमिनीचे पश्चिमेच्या कडेला संस्थेच्या मालकीच्या जागेमध्ये दोन झोपड्यांचे चालविलेले बांधकाम ताबडतोब बंद करून जागा खाली करण्यास सांगितले होते. त्या बेकायदेशीर अतिक्रमणा विरोधात  लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये  पोलीस तक्रार दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भिल्ल समाजाची वस्ती असल्याचा दावाही खोटा आहे.’’ सरकारी गायरान मिळकतीत भिल्ल वस्ती आहे. त्यालगत पूर्व बाजूस व्हीएसआयची जमीन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देवस्थान असून पूजाअर्चा केली जाते, हे देखील खोटे असल्याचा दावा व्हीएसआयने केला आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest