पुणे : अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर सुरूच

पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर आणि शिवाजीनगर ड्रग्ज पार्टीनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून बेकायदा बांधकामांवर धडक कारवाईचे सत्र सुरू आहे.

unauthorized constructions

पुणे : अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर सुरूच

हडपसर, कोथरूड, पौड रस्ता, एफसी रस्त्यावरील रूफटॉप हॉटेल, बार, रेस्टॉरंटवर कारवाई

पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर आणि शिवाजीनगर ड्रग्ज पार्टीनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून बेकायदा बांधकामांवर धडक कारवाईचे सत्र सुरू आहे. हडपसर भागासह, कोथरूड, पौड रस्ता, शिवाजीनगर भाग आणि एफसी रस्त्यावरील अनधिकृत हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटवर शुक्रवारी आणि शनिवारी (दि. ५ आणि ६) या दोन दिवसांत महापालिकेने पुन्हा कारवाई करत एकूण सुमारे ४७,४२० चौरस फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले.

पुणे महापालिकेकडून एमआरटीपी १९६६ अन्वये कलम ५३ नुसार हडपसर, पुणे सोलापूर रस्ता, तसेच साडेसतरा नळी हडपसर येथे एकूण ११ अनधिकृत बार, रेस्टॉरंट, रूफटॉप हाॅटेल तसेच  अनधिकृत आरसीसी बांधकामांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र संबंधितांनी स्वतःहून कोणतेही अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्याने शुक्रवारी १८,७०० चौरस  फूट अनधिकृत  बांधकाम पाडण्यात आले.  बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून ४ ब्रेकर, ४ जेसीबी, ५  ग्रॅस कटर, २० बिगारी यांच्यासह पोलीस विभागाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक एककडून करण्यात आली, तर शनिवारी अतिक्रमण विभाग बांधकाम विभाग तसेच डेक्कन पोलीस ठाणे यांच्याकडून संयुक्त कारवाई करत १२,६१० चौरस फूट इतके बांधकाम पाडले, तर कोथरूड, एफसीरस्ता, पौड रस्त्यावरील १६,११० चौरस फूट इतके बांधकाम पाडले. ही कारवाई झोन क्रमांक सहाकडून करण्यात आली.

पुण्यात ड्रग्ज पार्टी रंगल्यानंतर शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटवरील थंडावलेल्या कारवाईला पुन्हा एकदा जोर देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याची धडक कारवाई सुरू आहे.  एफसी रस्त्यासह शहरातील तब्बल २६ ठिकाणांवरील पब, बार, रेस्टॉरंटवर धकड कारवाई केली. त्यानंतर म्हात्रे पूल, राजाराम पूल, जवळील नदीपात्रातील डीपी रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर शुक्रवारी हडपसर भागात महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर  जंगली महाराज रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या जागेवर जेएम  कॉर्नर नावाची चौपाटी उभारण्यात आली होती. त्या चौपाटीवर गुरुवारी पालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करत ३४०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले होते.

शहरात अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम करून व्यवसाय केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यावर आता महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे. अनेकांना नोटिसा दिल्यानंतरही बेकायदा बांधकाम काढून घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून फक्त नोटिसांचा खेळ खेळला जात होता. मात्र कारवाई केली जात नव्हती. आता महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाने दिलेल्या नोटिसांचा पाठपुरावा सुरू केला असून नोटिसा दिल्यानंतर काय कारवाई केली जाते, याचा आढावा बैठकीत घेतला जात आहे. त्यामुळे आता बांधकाम विभागाकडून कारवाई केली जात आहे.

शनिवारी या ठिकाणी केली कारवाई

खान्देशी तडका ८०० चौरस फूट

खाना जंक्शन १०१० चौरस फूट

ऑक्सिजन कॅफे ५२०० चौरस फूट

ब्ल्यूस्टिक पूल २५०० चौरस फूट

आनंद फास्ट फूड १२०० चौरस फूट

ममता पराठा ८०० चौरस फूट

चाय अड्डा ७०० चौरस फूट

समृद्धी डायनिंग हॉल ४०० चौरस फूट

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest