संग्रहित छायाचित्र
पुणे: भारतीय जनता पार्टी (BJP) हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला जातो. ‘पंचायत से पार्लमेंट तक’ या पक्षाचे वर्चस्व असले तरी अन्य पक्षातील नेत्यांना फोडून पक्षप्रवेश देण्याचे राजकारण देशाला फार नवे नाही. विरोधी पक्षांतील अनेक नेते ईडीची पिडा अन् तुरुंगवारी टाळण्यासाठी तसेच दीर्घकालीन निश्चिंत निद्रेसाठी भाजपाच्या शामियानात दाखल होत आहेत. एकेकाळी एकमेकांवर गरळ ओकणारे, सडकून टीका करणारे वरिष्ठ नेते अचानक गळाभेट घेताना दिसतात, परंतु वर्षानुवर्षे एखाद्या पक्षात काम करणारे, मतदारसंघाची बांधणी करणाऱ्या इच्छुकांची मात्र गळचेपी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र दोन टर्म मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी (दि. १३) भाजपात प्रवेश केला. यामुळे पुणे शहर, जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतील चव्हाण समर्थक इच्छुकांची घालमेल होऊ लागली आहे. लोकसभेचे राजकारण बेरजेचे असले तरी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी देव पाण्यात ठेवलेल्या विद्यमान आमदारांनादेखील घाम फुटू लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्वच नेते काँग्रेसला (Congress) शिव्याशाप देत असले तरी काॅंग्रेसच्याच नेत्यांना 'खिंडीत' गाठून पक्षप्रवेश देत 'पावन' केले जाते. आदर्श घोटाळ्यावर रान उठवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह अनेक भाजपा नेते आता आदर्श नेता म्हणून अशोक चव्हाण यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
भाजपातील इच्छुकांमध्ये घालमेल
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याने काँग्रेसला हादरा बसला असताना दुसरीकडे पुणे कॅन्टोन्मेंटसह अन्य मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची घालमेल सुरू झाल्याचे बोलले जात आहे. राजकारणात काहीही घडू शकते, या उक्तीनुसार ऐनवेळी चव्हाण यांच्या मर्जीतील उमेदवार पुण्यातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपातील विद्यमान आमदारांसह इच्छुकांचीही घालमेल सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मनसेचा महायुतीतील प्रवेश तूर्तास लांबला!
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर काही निवडक जागांवर मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून पक्षबांधणी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू असताना मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत गुप्त बैठका घेत महायुतीत सामील होण्याची रणनीती आखली जात होती. परंतु अशोक चव्हाण यांच्या रूपाने मोठा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. त्यांच्यासोबत काही आमदार आल्यास भाजपाला मनसेची गरज भासणार नाही. त्यामुळे तूर्तास मनसेचा महायुतीत प्रवेश लांबला असेच म्हणावे लागेल.
पुण्यातील चव्हाण समर्थक ‘वेट ॲण्ड वाॅच’भूमिकेत
राहुल गांधी वगळता काँग्रेसमधील नेत्यांची भाऊगर्दी ही स्वार्थाने बरबटलेली आहे, त्याची प्रचिती पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यातून आली. काँग्रेसचे किमान १६ ते १८ आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम म्हणून पुणे शहरातील आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा मतदारसंघाची गणितेदेखील बिघडणार आहे. आगामी राजकीय समीकरणावरदेखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व पक्ष फोडून झाल्यानंतर आता काँग्रेसलाही भगदाड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मागील काही वर्षांपासून महापालिका, विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी करणार्या अशोक चव्हाण समर्थकांची मात्र चव्हाण यांच्या भूमिकेमुळे कोंडी झाली आहे. ते आता नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अगोदरच मरगळ आलेल्या काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. चव्हाण यांचे अनेक समर्थक आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील माजी आमदारांसह नगरसेवकांनी आता दोन दिवसांत आपला राजकीय निर्णय जाहीर करू, असे स्पष्ट केल्याने काँग्रेस पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चव्हाण यांचे कट्टर समर्थक त्यांच्यासमवेत भाजपमध्ये जातील, अशी अटकळी बांधल्या जात आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती विधानसभा मतदारसंघात चव्हाण समर्थकांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडून अनेक दिग्गज नेते अशोक चव्हाणांच्या मागे जातील, अशी चर्चाही जोरात सुरू झाली आहे. विशेष करून माजी आमदार, नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्यांनी मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.