पुणे: मिळकतकराची पुन्हा थकबाकी! - अभय योजनेचा लाभ घेऊनही निम्म्या मिळकतदारांचा कर थकित

मिळकतकर थकवलेल्या नागरिकांसाठी पुणे महापालिकेने अभय योजना लागू केली होती. त्यानुसार थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला. मात्र ज्यांच्यासाठी ही योजना आणली त्याच मिळकतदारांपैकी निम्म्या मिळकतदारांनी पुन्हा कर थकबाकी ठेवली असल्याची धक्कादायक माहिती ‘आरटीआय’मधून समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र

आता करआकारणी विभागाकडून विशेष वसुली मोहीम

मिळकतकर थकवलेल्या नागरिकांसाठी पुणे महापालिकेने अभय योजना लागू केली होती. त्यानुसार थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला. मात्र ज्यांच्यासाठी ही योजना आणली त्याच मिळकतदारांपैकी निम्म्या मिळकतदारांनी पुन्हा कर थकबाकी ठेवली असल्याची धक्कादायक माहिती ‘आरटीआय’मधून समोर आली आहे.

मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून पुणे महापालिकेने २०२०-२१ मध्ये अभय योजना आणली होती. या योजनेचा १,४९,६८३ थकबाकीदार मिळकतकरधारकांनी फायदा घेत करभरणा केला. मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड आणि व्याजमाफीपोटी महापालिकेचे २१० कोटी रुपयांचे नुकसान झाले. (PMC News)

महापालिकेने लगेचच २०२१-२२ मध्ये पुन्हा एकदा मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून अभय योजना आणली होती. या योजनेचा ६६,४५४ थकबाकीदार मिळकतकरधारकांनी फायदा घेतला आणि कर भरला.या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ज्या वेळी अभय योजना राबविण्यात आली, त्यावेळी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर हा अन्याय असल्याचे महापालिकेला सांगण्यात आले होते, असे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. वेलणकर यांनीच याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्याच्या उत्तरात मिळालेल्या माहितीतून अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतदारांनी पुन्हा कर थकबाकी ठेवली असल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’सोबत बोलताना विवेक वेलणकर म्हणाले, ‘‘या योजनेमुळे दरवर्षी प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी भीती आमच्यासह अनेकांनी व्यक्त केली होती. थकबाकीदार सोकावतील आणि नवीन अभय योजना येईपर्यंत कर भरणार नाहीत, असेही सांगण्यात आले होते. दुर्दैवाने आमची भीती खरी ठरली. महापालिकेच्या मालमत्ता करविभागाकडे माहिती अधिकारात विचारले होते की, या अभय योजनेचा फायदा घेतलेल्यांपैकी किती मालमत्ताधारक ३१ मार्च २०२४ रोजी पुन्हा थकबाकीदार झाले आहेत?  त्यांनी किती कर भरलेला आहे? यावर महापालिकेने दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. २०२०-२१ मध्ये ज्या १,४९,६८३ थकबाकीदार मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला त्यापैकी ५६,९०४ मालमत्ताधारक मार्च २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले. तर‌ २०२१-२२ मध्ये ज्या ६६,४५४  थकबाकीदार मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला, त्यापैकी ४१,५०० मालमत्ताधारक मार्च २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत.’’

अभय योजनेचा फायदा घेतल्यानंतरही जे लाखभर‌ मालमत्ताधारक पुन्हा एकदा ३१ मार्च २०२४ अखेर थकबाकीदार झाले आहेत, त्यांची वसुली तातडीने करावी. भविष्यात कधीही त्यांना कोणत्याही अभय योजनेचा फायदा देण्यात येऊ नये.
  - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली आहे, ती माहिती महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. अभय योजनेचा लाभ घेऊन पुन्हा थकबाकी ठेवणाऱ्या मिळकतदारांवर काय कारवाई करायची, याचा निर्णय आयुक्त घेतील. आता अशा थकबाकीदारांनी स्वतंत्र यादी काढली जाईल. त्यांच्यासाठी विशेष वसुली मोहीम राबविली जाईल. महापालिकेकडून आता पुन्हा अभय योजना राबविण्याचा विचार नाही.
 - माधव जगताप, मिळकर करआकारणी विभागप्रमुख, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest