अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर छापेमारी
पुणे जिल्हयातील हातभट्टी दारूचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या छापेमारीत गेल्या ८ दिवसात म्हणजेच ४ मे ते १२ मे २०२३ दरम्यान ४७ जणांना अटक करण्यात आली असून एकूण ८४ पैकी ६८ वारस गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे हातभट्टी दारूचे उद्योग सुरू आहेत. हे उद्योग समूळ नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाकडून छापेमारी करण्यात येत आहे. याबाबतची छापेमारी सुरू असताना येरवाडा येथील इमस अवैध हातभट्टी दारू व्यवसाय करत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून अवैध हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्या रमेश ईमजी चव्हाण (वय ४१, जयजवाननगर, येरवडा, पुणे) या अटक केली आहे. त्याच्यावर एम.पी.डी.ए १९८१ अंतर्गत स्थानबध्द करण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच गेल्या ८ दिवसांमध्ये म्हणजेच ४ मे ते १२ मे २०२३ दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वेगवेगळ्या कारवायामध्ये हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून ८४ गुन्हे नोंदवले आहेत. त्यातील ६८ वारस गुन्हे असल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्याअंतर्गत ४७ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून १० वाहने जप्त केली असून ३० लाख १९ हजार ०७० किंमतीची मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, हातभट्टी निर्मिती व विक्री करणाऱ्या एकुण ३२ आरोपींविरुध्द एम.पी.डी.ए. १९८१ अंतर्गत कारवाई करण्यासाठी या विभागाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.