पुणे: कचरा वेचकाच्या मुलीची भारतीय नौदलात निवड

पुणे : पुण्यातील वानवडी भागात काम करणाऱ्या स्वच्छ कचरा वेचक ज्योती पंडित यांची मुलगी श्वेता पंडित हिची भारतीय नौदलात निवड झाली असून ती चिलका, ओरिसा येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे.

कचरा वेचकाच्या मुलीची भारतीय नौदलात निवड

स्वच्छ संस्थेच्या उपक्रमांमुळे मिळाले घवघवीत यश

पुणे : पुण्यातील वानवडी भागात काम करणाऱ्या स्वच्छ कचरा वेचक ज्योती पंडित यांची मुलगी श्वेता पंडित हिची भारतीय नौदलात निवड झाली असून ती चिलका, ओरिसा येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे. खडतर परिस्थितीत, अपयशांचा सामना करत, आपल्या अथक परिश्रमातून श्वेताने आपल्या यशातून एका अविश्वसनीय बदलाचा प्रवास जगासमोर आणला आहे. 

लहानपणीपासून देशसेवेसाठीच काम करायचे या ध्यासाने झपाटलेल्या श्वेताने शाळेत राष्ट्रीय कॅडेट कोरमध्ये सहभाग घेतला. मराठी ते इंग्रजी माध्यम या बदलास सामोरे जात तिने बारावी परीक्षेत ७८ टक्के मार्क मिळवले. मिलिटरी नर्सिंग सर्विस, पोलिस भरती अशा परीक्षांमध्ये आलेल्या अपयशाने खचून न जाता तिने आपली तयारी सुरू ठेवली. दररोज १० तास अभ्यास, खडतर शारिरीक व्यायाम करत तिने नौदल परीक्षेची तयारी केली. शारिरीक तंदुरुस्ती, आरोग्य परीक्षा व लेखी परीक्षा या तिन्हीमध्ये उत्तम कामगिरी केली आणि अखेर तिच्या कष्टांना फळ मिळाले. 

४०० मुलींमधून श्वेताच्या चांगल्या कामगिरीमुळे तिची भारतीय नौदलात निवड झाली. आपल्या प्रवासाकडे मागे वळून बघताना श्वेताने आपल्या आईप्रति, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या संस्थांप्रति त्यांनी नेहमी दिलेल्या सक्षम आधारासाठी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेद्वारे वह्या आणि शाळेची फी अशा मूलभूत गोष्टींची काळजी घेतली गेली. संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचकांच्या मुलांच्या युवा गटांद्वारे जी जडणघडण झाली, आपले करियर, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे प्रोत्साहन मिळाले त्याचा आपल्या यशात मोठा वाटा आहे अशी भावना तिने व्यक्त केली. आईच्या कचरा संकलनाच्या कामाची किंमत मी जाणते आणि तिच्या कधीही हार न मानण्याचा स्वभाव बघत मी मोठी झाले असेही तिने सांगितले. 

ज्योती पंडित, कचरा वेचक, स्वच्छ संस्था यांनी आपल्या मुलीबद्दल अभिमान व्यक्त केला, “मला आई म्हणून माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. मी २०१३  पासून स्वच्छ संस्थेची सभासद आहे आणि वानवडी गावात दारोदार कचरा संकलनाचे काम करते. आपल्या देशासाठीच सेवा करावी अशी श्वेताची मनापासून इच्छा होती. तिच्या झोकून देऊन परीक्षेची तयारी करण्याच्या प्रवासाची मी साक्षीदार आहे आणि तो प्रवास आठवून माझे डोळे पाणावतात. तिला जेव्हा निवड झाल्याची बातमी समजली तेव्हा आमच्या आनंदाला सीमाच उरली नाही. पण या सगळ्या आनंदात मला तिला ट्रेनिंग साठी लागण्याऱ्या अत्यावश्यक वस्तूंची यादी झोप लागू देत नव्हती. मग मी पुन्हा संस्थेकडे गेले आणि त्यांनी मला निधी उभारायला मदत केली. श्वेताच्या या यशाने माझा उर अभिमानाने भरून आला आहे.”

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest