पुणे: तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची १० ते १२ जुलै दरम्यान परीक्षा

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा चाचण्यांचा समावेश असून, पायाभूत चाचणी १० ते १२ जुलै दरम्यान होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 03:02 pm
Pune news, Foundation Test, July 10 and 12, periodical assessment tests

संग्रहित छायाचित्र

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा चाचण्यांचा समावेश असून, पायाभूत चाचणी १० ते १२ जुलै दरम्यान होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून त्यानुसार पायाभूत चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. त्यात तिसरी ते नववीच्या प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची लेखी आणि तोंडी चाचणी घेतली जाणार आहे. मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, मूलभूत क्षमतेवर ही चाचणी आधारित असणार आहे. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात चाचणी आयोजित करण्याचे, तसेच लेखी परीक्षेनंतर त्या दिवशी तोंडी परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पायाभूत चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थिनिहाय प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून पुरवल्या जाणार आहेत. परीक्षेच्या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो हजर होईल त्या दिवशी परीक्षा घ्यावी. पायाभूत चाचणीतील मुल्याकंनानुसार शिक्षकांनी कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांची संकलित चाचणीमध्ये कामगिरी वाढण्यास मदत होईल.

गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, तालुका समन्वयकांनी विद्यार्थिनिहाय प्रश्नपत्रिका पुरवठ्याची खातरजमा करून घ्यावी. तालुका समन्वयकांनी प्रश्नपत्रिका मोजून मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्याव्यात. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या सांख्यिकीय माहितीनुसार प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार असल्याने त्या कमी पडल्यास किंवा छायांकित प्रती काढाव्या लागल्यास त्याचे देयक दिले जाणार नाही. त्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकाऱ्यांची असेल, असेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

गुणनोंदणी ऑनलाइन

पायाभूत चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र येथे नोंदवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षकांनी चाचण्या तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्रामार्फत उपलब्ध होणाऱ्या संकेतस्थळावर नोंदवायचे आहेत. त्यासाठीच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest