पुणे: मुसळधार पावसानंतर उखडलेल्या रस्त्यांवर मलमपट्टी सुरू

पुणे: शहरासह उपनगर भागात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहराची दैना उडाली आहे. रस्त्यावर नुकतेच नव्याने टाकण्यात आलेले डांबर उखडले असून खड्डे पडले आहेत. तसेच यापूर्वी रस्त्यावर पॅच मारून ठिगळे लावण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 27 Jul 2024
  • 01:09 pm
Pune News, Pune Rains, Pune Flood, Pune Roads, Patchwork

पुणे: मुसळधार पावसानंतर उखडलेल्या रस्त्यांवर मलमपट्टी सुरू

शहरात सर्वत्र ठिगळांवर पुन्हा ठिगळं लावण्याची वेळ, पथ विभागाच्या निष्कृट कामाचे पितळ उघडे

पुणे: शहरासह उपनगर भागात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहराची दैना उडाली आहे. रस्त्यावर नुकतेच नव्याने टाकण्यात आलेले डांबर उखडले असून खड्डे पडले आहेत. तसेच यापूर्वी रस्त्यावर पॅच मारून ठिगळे लावण्यात आली होती. त्याच ठिगळांवर आता खड्डे पडल्याने त्यावर पुन्हा ठिगळे लावण्याची वेळ महापालिकेवर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  

महापालिकेच्या पथ विभागाने यंदा चांगले रस्ते पुणेकरांना देणार असल्याचा दावा केला होता. मात्र या दाव्याचा विसर पथ विभागाला पडला असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (दि. २५) शहरात तब्बल ११४.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पुणे महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या निष्कृट दर्जाच्या कामाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले आहे.

शहरातील रस्त्यांवर खड्डे पडलेल्या ठिकाणी पथ विभागाने पॅच मारले होते. त्यामुळे समतल रस्त्याच्या मधेच उंचवटे तयार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा याच पॅचवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मागचे दिवस पुन्हा पुढे आल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. मुसळधार पावसात महापालिकेचे रस्ते तग धरत नसल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. ठेकेदारांनी केलेल्या निष्कृट दर्जाच्या कामाचे दर्शन आता होऊ लागले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे शहरातील पडलेल्या खड्ड्यांमधून रस्ता शोधत त्यातून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

खड्डे बुजवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी एक कोटी रुपये

शहरातील १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेच्या रस्ते विभागाच्या मुख्य विभागामार्फत केले जाते. १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते क्षेत्रीय कार्यालयामार्फत बांधून त्यांची देखभाल केली जाते. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे रस्त्यांवरील खड्डे दूर करण्यात आल्याचे रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, हजारो खड्डे खरोखरच दुरुस्त झाले असतील तर रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण का कमी होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून तसेच वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

म्हणे, सव्वा वर्षात ७,२८३ खड्डे बुजवले; केवळ २३ शिल्लक

दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पुणे महापालिकेने सात हजाराहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. १ मार्च २०२३ पासून शहरात एकूण ७,२८३ खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र बुजवलेले खड्डेच पुन्हा उखडले आहेत की नव्याने खड्डे तयार झाले आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. आता पुणे महापालिकेला खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा पैसे खर्च करावे लागणार आहेत.

पुणे महापालिकेने शहरातील तब्बल ७,२८३ खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. मात्र अद्यापही उपनगरातून शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहे.

महापालिकेच्या पथ विभागाकडून रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पॅच मारले आहेत. त्याचाही त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, एटीएमएस सिग्नल यंत्रणा, खासगी कंपन्या आदी कामांसाठी वर्षभर खोदकाम केले जाते. जेथे खोदकाम केले जाते तेथे जास्त खड्डे तयार होतात. काही ठिकाणी पथ विभागाने रस्ता तयार करूनही पुन्हा रस्ते खोदल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदाही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या दाव्यानुसार सध्या शहरातील रस्त्यांवर केवळ २३ खड्डे शिल्लक आहेत. मात्र, प्रत्यक्षात आजही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत आहेत. सिंहगड रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून त्या त्या भागातील खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. काही ठिकाणी पॅच मारलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. नव्याने खड्डे तयार झाले आहेत. ते तत्कळ बुजवले जात आहेत.
- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest