पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील विनापरवाना शॉपिंग मॉलवर कारवाई

फर्ग्युसन रस्त्यावरील शिरोळे प्लॉटवरील विनापरवाना शॉपिंग मॉल पाडण्याचे काम सुरू असतानाच न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. मात्र न्यायालयाने ही स्थगिती उठवताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. ११) उर्वरीत मॉलही पाडून टाकला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Edited By Admin
  • Thu, 13 Jun 2024
  • 11:24 am
pune news

विनापरवाना शॉपिंग मॉलवर कारवाई

फर्ग्युसन रस्त्यावर शिरोळे प्लॉटमधील विनापरवाना माॅल पाडण्यासंदर्भातील स्थगिती उठताच सात हजार चौरस फूटाचे स्ट्रक्चर काढले

फर्ग्युसन रस्त्यावरील शिरोळे प्लॉटवरील विनापरवाना शॉपिंग मॉल पाडण्याचे काम सुरू असतानाच न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. मात्र न्यायालयाने ही स्थगिती उठवताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. ११) उर्वरीत मॉलही पाडून टाकला.

शिरोळे प्लॉटवर लोखंडी स्ट्रक्चरमध्ये दुमजली शॉपिंग मॉल उभारण्यात आला होता. सुमारे १२ हजार चौरस फूटाच्या या मॉलमध्ये पत्र्यांचे पार्टिशन करून ७० स्टॉलवजा दुकाने सुरू करण्यात आली होती. या मॉलसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेने आठ वर्षांपूर्वी नोटीस बजावत मॉल काढून टाकण्याचे आदेश दिले होते. याविरोधात संबधित व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मागील वर्षी सदर कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र न्यायालयाने ही स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेच्या वतीने तातडीने कारवाई करून सुमारे सात हजार चौरस फुटांचे स्ट्रक्चर काढून घेण्यात आले

मंगळवारी महापालिकेची कारवाई सुरु असतानाच न्यायालयात गेलेल्या व्यावसायिकाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा स्थगिती आदेश देण्यात आला. यामुळे उर्वरित कारवाई होऊ शकली नव्हती. उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने मॉलचे उर्वरीत लोखंडी अँगल व पत्र्याचे स्ट्रक्चर पाडून टाकले.  मॉलमुळे फर्ग्युसन रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉलमध्ये हवा आणि उजेडाची सोय नसल्याने आगीसारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली असती. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वडगाव शेरीतही कारवाई
बांधकाम विभाग झोन क्रमांक चारअंतर्गत पुणे पेठ वडगाव शेरी सर्व्हे क्रमांक ३४ येथे कारवाई करण्यात आली. इमारतीच्या सामासिक अंतरातील सुमारे १,५०० चौरस फूट कच्चे-पक्के अनधिकृत पत्रा शेड तसेच  लोहगाव परिसरातील कलवड वस्ती वस्ती सर्व्हे क्रमांक २५९ येथील नाल्यावरील अतिक्रमित बांधकामामावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सुमारे ९,५०० चौरस फूटाच्या अनधिकृत धार्मिक शेडवरदेखील कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे वडगाव शेरीत एकूण ११ हजार चौरस फूट अनधिकृत पत्रा शेड आणि कच्च्या-पक्क्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest