२१ हजार दिव्यांमधून साकारली प्रभू श्रीरामांची तेजोमय प्रतिकृती
पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भव्य भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो पुणेकरांनी एकत्र येत २१ हजार दिव्यांनी प्रभू श्रीरामांची तेजोमय प्रतिकृती साकारण्यात आली. हजारो दिव्यांनी, आकर्षक व नयनरम्य आतषबाजीने श्रीराम मंदिर परिसर उजळून निघाला. (Pune News)
टिळक रस्त्यावरील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या श्रीरामनगरीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून तीन दिवस 'अपने अपने राम' रामकथेचे श्रवण केल्यानंतर आज सोमवारी हजारो पुणेकरांनी भव्य दीपोत्सव साजरा केला. २१ हजाराहून अधिक लखलखत्या दिव्यांपासून सूर्याच्या व कमळाच्या आकृतीमध्ये तेजोमय 'श्रीराम' अशी रामाची प्रतिकृती साकारली होती. या अशा अभूतपूर्व उपक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून दीप प्रज्वलीत केले. रामगीते, रामनामाचा जयघोष, रामाची आराधना यामुळे परिसर भक्तिमय झाला होता. (Latest News Pune)
'जय श्री राम', 'सियावर रामचंद्र की जय' 'श्रीराम जय राम जय जय राम' अशा उद्घोषांनी परिसर दुमदुमला होता. राम मंदिराच्या प्रतिकृतीवर झालेला लेझर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी झालेल्या गंगा घाट आरतीने भक्तिरसाची अनुभूती दिली.
अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती साकारताना स्थापित केलेल्या समितीमधील ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, संयोजक मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ यांच्या हस्ते दीपोत्सवातील पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर हजारो महिलांनी दिवे प्रज्वलित केले.
मुरलीधर मोहोळ, "आज येथे या पावन अशा दीपोत्सवाला ज्येष्ठ मूर्तिकार गो. बं. देगलूरकर यांची उपस्थिती प्रेरणादायी आहे. आजचा सोहळा मानसिक समाधान देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून शेकडो वर्षांची स्वप्नपूर्ती झाली असून, संबंध देशभर दीपोत्सव, आनंदाचा उत्सव साजरा होत आहे. पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंद द्विगुणित करणारा आहे."
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.