राजकारणी रंगले रंगांच्या उधळणीत!

सतत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची उधळण करणाऱ्या राजकारण्यांनी धूलिवंदनाला हेवेदावे बाजूला ठेवून आनंदाने, उत्साहाने धुळवड साजरी केली. लोकसभा निवडणुकीची धुळवड सुरू झाल्याने या वर्षी धुळवडीला अधिक रंग भरला होता.

राजकारणी रंगले रंगांच्या उधळणीत!

सतत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची उधळण करणाऱ्या राजकारण्यांनी धूलिवंदनाला हेवेदावे बाजूला ठेवून आनंदाने, उत्साहाने धुळवड साजरी केली. लोकसभा निवडणुकीची धुळवड सुरू झाल्याने या वर्षी धुळवडीला अधिक रंग भरला होता. राजकीय नेत्यांनी प्रचारातून सुट्टी घेत सामान्यांसोबत रंग खेळण्याला पसंती दिली. (Holi 2024)

भोई प्रतिष्ठानने विशेष मुलांसाठी रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान येथे ‘रंग बरसे’ हा रंग महोत्सव आयोजित केला होता. या उपक्रमाचे हे २८ वे वर्षे असून हजारो विशेष मुलांनी याचा आनंद लुटला. यावेळी अनाथ, एचआयव्ही पॉझिटिव्ह, मतिमंद, अपंग, अंध मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले, बुधवार पेठेतील देवदासींची मुले, रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुले अशी विशेष मुले सहभागी झाली होती. तसेच पोलीस, प्रशासन ,चित्रपट, साहित्य, कला ,संस्कृती , पत्रकारिता, राजकारण , समाजकारण या विविध क्षेत्रातील लोकांनी मुलांसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला. याप्रसंगी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar),  भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रंगांची उधळण केली. त्यांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आज विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा, अशी प्रतिक्रिया दिली.

भोई प्रतिष्ठान (Bhoi Foundation) ही सामाजिक काम करणारी संस्था आहे. त्यांनी मुलांच्या आनंदासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा कार्यक्रमामध्ये सर्वजण आनंदाने सहभागी होतात. लोकसभेची निवडणूक पुणेकरांनी हातात घेतली आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. आमच्या मागे वस्ताद आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार अन् जिंकणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी गुलाल खेळत आहे. त्यामुळे लोकसभेच्या विजयाचा गुलालदेखील खेळणार आहे.  — रवींद्र धंगेकर

पुण्याचे वैशिष्ट्य असे आहे की राजकारणाच्या वेळी राजकारण केले जाते. धुळवड हा सण साजरा करताना यामध्ये राजकारण आणले जात नाही. पुणेकर हे संस्कृतीचे जतन करतात. समाजाच्या विकासासाठी आणि प्रबोधनासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवत आम्ही एकत्र आलो आहोत.— रुपाली चाकणकर

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest