बॅन्डबाजा पथकामुळे १ कोटी ५८ लाख रुपयांची वसुली
पुणे: एकत्रित करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) कडक धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर पुणे महापालिकेकडून बॅन्डबाजा वाजविण्यास सुरुवात केली असून या बॅण्डपथकामुळे १ कोटी ५८ लाख रुपयांची वसुली झाली आहे. (Latest News Pune)
महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाने २६ फेब्रवारीअखेर मिळकत करापोटी एकूण १९६८ कोटी जमा केले आहेत. थकबाकी वसुलीसाठी सोमवारपासून (दि. २६) बॅन्डपथक पाठविण्यास सुरुवात केली आहे. शनिवार ते सोमवार या तीन दिवसांत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३० मिळकती जप्त केल्या आहेत, अशी माहिती करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
दरम्यान, या तीन दिवसात एकूण ९ कोटी २५ लाख इतका मिळकत कर वसूल करण्यात आला आहे. सोमवारी एकूण १,२०० थकबाकी असलेल्या मिळकतींना नोटीस बजाविण्यात आली असून एका दिवसाचा एकूण भरणा ८ कोटी ४५ लाख इतका जमा झाला आहे.
महापालिका प्रशासनाने यंदाच्या आर्थिक वर्षांत सुमारे २ हजार ४०० कोटी रुपये मिळकतकर जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ४० टक्के मिळकतकराच्या सवलतीच्या मुद्द्यामुळे यंदा मिळकतकराची बिले वाटपास विलंब झाला होता. परिणामत: मिळकतकर जमा करण्यासही विलंब झाला. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी करआकारणी आणि करसंकलन विभागाला अतिरिक्त दीडशे कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
मिळकतधारकांना कर भरता यावा, यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रे शासकीय सुट्टीच्या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत तसेच रविवार सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावरून मिळकत कर भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.