होर्डींगधारकांकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम थकित
पुणे : महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी होर्डींगसाठीचा दर वाढविला आहे. मात्र, वाढलेल्या दरामुळे होर्डींगधारक परवान्याचे नूतनीकरणच करण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. शहराच्या काही भागातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असताना काही भागातून अक्षरश: शून्य महसूल मिळत आहे. त्यामुळे शहरातील होर्डींगच्या परवान्यांचे नतूनीकरण केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
शहरातील अधिकृत होर्डिंगधारक त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करताना दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात 1826 होर्डिंग परवान्यांपैकी केवळ 245 परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे उपायुक्त माधव जगताप यांनी येत्या सात दिवसांत सर्व होर्डिंगधारकांनी नूतनीकरणाचे प्रस्ताव सादर करावेत, असा कडक इशारा दिला आहे. दूर्लक्ष करणाऱ्या होर्डिंग आणि फ्लेक्सवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
माधव जगताप यांनी नुकतीच सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक बोलावली होती. सर्व अधिकृत होर्डींगधारकांनी परवाने आठवडाभरात नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे अधिकृत जाहिरातदार विहित मुदतीत नूतनीकरणाचे प्रस्ताव सादर करू शकले नाहीत, त्यांच्याविरुद्ध निष्कासनाची कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहराच्या हद्दीत जाहिरात फलक उभारण्याचे अधिकार पुणे महानगरपालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडे आहेत.
महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह आणि जाहिरातींचे नियमन आणि प्रदर्शनाचे नियमन, 2022 मध्ये नमूद केलेले वार्षिक बंधन आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचलित दरांनुसार जाहिरात शुल्काचे मूल्यांकन आणि संकलन यांचा समावेश आहे. नवीन होर्डींगसाठी दरात पाच पटीहून अधिक वाढ शिवाय, चालू आर्थिक वर्षात ज्यांना शहरात नवीन होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि फलक लावायचे आहेत त्या होर्डिंगधारकांसाठी 580 प्रति चौरस फूट वाढीव दर लागू करण्यात आला आहे, पूर्वी हा दर 111 रुपये प्रति चौरस फुट होता. या दरवाढीमुळे होर्डींगधारक परवाना नूतनीकरण करायलाच तयार नाहीत. पूर्वीपासून होर्डींग असणाऱ्यांना जुनाच दर लागू होणार आहे.
पुणे महानगरपालिका केवळ कालपव्यय करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवित आहे. होर्डिंग्समुळे 80% प्रदूषण होते. तरीही होर्डींगधारकांना मुदत का दिली जाते हा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे होर्डींग हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. होर्डींगधारकांना सात दिवसांत परवाना नूतनीकरण करण्याची मुदत दिली आहे. परवान्याचे नूतनीकरण केले नाही तर हे होर्डींग हटविले जातील. परवानाशुल्क भरणे टाळण्यासाठी हे प्रकार होत आहेत.
- माधव जगताप, महापालिका उपायुक्त,