ऑक्सफर्ड ऑफ द ईस्टला स्वतःचा पुस्तक महोत्सव
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया) या संस्थेच्या वतीने 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 'पुणे पुस्तक महोत्सव-2023' चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे पत्रकार परिषदेत अनावरण करण्यात आले. 'ऑक्सफर्ड ऑफ इस्ट' अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरातील पुस्तक महोत्सवाचे हे पहिलेच पर्व असणार आहे.
मराठे म्हणाले, 'राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड आणि इतर भारतीय भाषांमधील विस्तृत पुस्तक संग्रहांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक प्रकाशकांची दालने, सांस्कृतिक सादरीकरण, साहित्य विषयक विविध सत्रे, शालेय विद्यार्थी-महाविद्यालयीन युवकांसाठी विशेष उपक्रम, रमणीय खाद्यजत्रा अशा कार्यक्रमांचा महोत्सवात समावेश असेल.'
मराठे पुढे म्हणाले, 'गोमती, लडाख, उज्जैन, शिमला, शिलाँग येथील महोत्सवांच्या यशातून प्रेरणा घेत एनबीटी-इंडियाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून पुस्तकांची आवड आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार केला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात सर्व वयोगटातील विविध प्रकारचे आकर्षक उपक्रम सादर करून साहित्यिक आनंदाची हमी देण्यात आली आहे.'
पांडे म्हणाले, ' पुणे शहरात वाचन संस्कृतीला पोषक वातावरण आहे. या शहरात पुस्तकांची जागतिक बाजारपेठ होण्याची क्षमता आहे. यातून पुस्तक महोत्सवाची संकल्पना पुढे आली. शहरातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, साहित्य संस्था, ग्रंथालये, प्रकाशन संस्था, लेखक, अभ्यासक या सर्वांचा सहभाग घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.'
कुंटे म्हणाले, शिक्षण हे केवळ खडू आणि फळ्यापुरते मर्यादित नाही. जीवनातील सर्व अंगांचा विकास होणे शिक्षणात अभिप्रेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्त्वाचे काम आहे. हे काम या निमित्ताने होईल. हजारो पुस्तके या निमित्ताने पहायला मिळतील. विद्यार्थ्यांचे बौद्धिक आणि मानसिक पोषण करण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.