शाळांजवळ खुलेआम तंबाखूची दुकाने; निर्बंध असूनही महापालिका तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष
शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य (tobacco) पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर निर्बंध आहेत. मात्र, पुणे शहर आणि उपनगरातील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तंबाखू आणि सिगारेटची दुकाने सर्रास सुरू असल्याचे 'सीविक मिरर’ ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. ना महापालिका, ना अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यावर कारवाई करण्यात गंभीर आहे. मुख्याध्यापकांनाही कारवाईचे अधिकार आहेत; मात्र ते हतबल आहेत.(Pune News)
'सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने विक्री कायदा २००३ ' च्या कलम ६ (ब ) नुसार, कोणत्याही शाळा, महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटरच्या परिघात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. त्यात सिगारेटचाही समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील बहुतांश महाविद्यालयाजवळील पान स्टॉलवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. यातील बहुतांश टपऱ्यांची नोंदणीही झालेली नाही. एफडीएच्या आकडेवारीनुसार, शहरात सध्या सुमारे १५०० नोंदणीकृत टपऱ्या आहेत. पण प्रत्यक्षात पुण्यात २५ हजार ते ३५ हजार पानटपऱ्या असल्याचे दिसून येते.
शहरातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू आहे. शाळा-महाविद्यालयांच्या संरक्षक भिंतीलगतच्या फूटपाथवर या टपऱ्या आहेत. महाविद्यालयाच्या परिसराबाहेर कारवाई करण्यास मर्यादा येत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे मत आहे. काही टपऱ्यांवर 'येथे गुटखा, तंबाखू आणि सुगंधी सुपारी मिळेल' असे स्पष्ट लिहिले आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
हुजूरपागा येथील मुख्य गेटसमोर, बालशिक्षण मंदिर, रमणबाग शाळा, नूमवि शाळा, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्तांगणच्या मध्यवर्ती गेटसमोरील चहाच्या टपऱ्यांवर, शिंदे प्रशालेसमोर, सिंहगड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या गेटबाहेर, नळ स्टॉपजवळ, भावे प्रशालेच्या गेटसमोर, विमलाबाई गरवारे प्रशालेसमोर सिगारेट, तंबाखूची विक्री होते. या ठिकाणी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीही गर्दी करताना दिसतात. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. महापालिका आणि एफडीए प्रशासनाने ही जबाबदारी कॉलेजांवर ढकलली आहे. कॉलेजने तक्रार केली तरच कारवाई होऊ शकते. मात्र, कॉलेजकडून कोणतीही तक्रार नाही.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारी राज्यात कुठेही विकता येणार नाही. या आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची शाळा, महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात विक्री करण्यास बंदी आहे. कोणी विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार एफडीएसोबतच पोलिसांना आहेत. त्यासोबतच शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांनाही या प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर सुप्रसिद्ध शाळेच्या प्राचार्याने सांगितले की, महाविद्यालयाच्या आवारात धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनावर बंदी आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, गेटच्या बाहेर शंभर मीटरपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. प्राचार्य शशिकांत गायकवाड म्हणाले, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा विक्री रोखण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्या आहेत.आम्हाला कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी दक्षता घेतली पाहिजे.
एका प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की, शाळेच्या १०० मीटर परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, नियम आहे. मात्र, आम्ही शाळेबाहेर कारवाई करू शकत नाही. शाळांच्या शेजारी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची दुकाने असतील तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
नियमानुसार अशा धंद्यांना शाळेपासून दूर जागा देणे आवश्यक आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध झाले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.